महत्वाच्या बातम्या

 नरसिंगपूर परिसरात नरभक्षक वाघाचा धुमाकूळ : जेरबंद करण्याचे वनमंत्र्यांचे आदेश


- ड्रोन कॅमेरे, तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक दाखल; युद्धपातळीवर वाघाचा शोध सुरू

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी आष्टी : तालुक्यातील नरसिंगपूर जंगलालगतच्या शेतात नागपंचमीच्या दिवशी पूजा करीत असताना शेतकरी रामभाऊ भोयर यांच्यावर पट्टेदार वाघाने हल्ला करून त्यांना ठार केले होते. या घटनेनंतर परिसरातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाघाचा वाढता उपद्रव लक्षात घेऊन त्याला तातडीने जेरबंद करण्याचे आदेश राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले आहेत. आदेश प्राप्त होताच वनविभागाची संपूर्ण यंत्रणा कामाला लागली असून वाघाचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम राबविण्यात येत आहे.

रामभाऊ भोयर यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी वनविभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. या गंभीर परिस्थितीची आमदार सुमित वानखडे यांनी दखल घेतली. त्यांनी तातडीने वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी संपर्क साधून नरसिंगपूर परिसरातील वस्तुस्थिती आणि शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न त्यांच्या निदर्शनास आणून दिला.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वनमंत्री नाईक यांनी नरभक्षक पट्टेदार वाघाला तातडीने जेरबंद करण्याचे आदेश दिले. त्यानंतर राज्याचे सचिव तसेच प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्या कार्यालयाकडून वाघ पकडण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याबाबतचे आदेश वनविभागाला प्राप्त झाले आहेत.

चार दिवसांपासून शोधमोहीम -
तळेगावचे वनपरिक्षेत्राधिकारी जी. बी. लांबाडे आणि आष्टीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी पूनम ब्राह्मणे यांच्या नेतृत्वाखाली वनविभागाने गेल्या चार दिवसांपासून वाघाचा शोध सुरू केला आहे. जंगल परिसर तसेच वनविभागाच्या हद्दीत वाघाच्या हालचालींचा मागोवा घेतला जात आहे.

वाघाला जेरबंद करण्याचे आदेश मिळाल्यानंतर शोधमोहीम आणखी तीव्र करण्यात आली आहे. वाघाच्या संभाव्य हालचालींचा शोध घेण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर सुरू करण्यात आला असून भूल देऊन वाघाला पकडण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे पथकही जंगलात दाखल झाले आहे. त्यामुळे वाघाला लवकरात लवकर जेरबंद करण्यासाठी वनविभागाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.

जिल्हास्तरावरून आणखी पथके दाखल होणार -
वनमंत्र्यांच्या आदेशानंतर जिल्हास्तरावरून या मोहिमेसाठी आणखी पथके आणि आवश्यक मनुष्यबळ वाढविण्यात येण्याची शक्यता आहे. वाघाला जेरबंद करेपर्यंत परिसरातील शेतकऱ्यांच्या मनातील भीती कायम राहणार आहे. शेतशिवारात जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून वनविभागाच्या मोहिमेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रामभाऊ भोयर यांच्या मृत्यूच्या घटनेनंतर नरसिंगपूर परिसरात निर्माण झालेली दहशत दूर करण्यासाठी वाघाचा तातडीने बंदोबस्त होणे आवश्यक असल्याची भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत. आता वनविभागाच्या युद्धपातळीवरील शोधमोहिमेत वाघ कधी जेरबंद होतो, याकडे आष्टी तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.





  Print






Related Photos