शांतीनगरातील ४० वर्षीय महिला बेपत्ता : वर्धा नदीकाठावर चपला आढळल्याने शोधमोहीम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : शांतीनगर परिसरातील सुमारे ४० वर्षीय महिला कालपासून घरातून बेपत्ता झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला असता तिचा ठावठिकाणा लागला नाही. दरम्यान, आज बल्लारपूर–राजुरा मार्गावरील वर्धा नदीच्या किनारी तिच्या चपला आढळून आल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला काल घरातून बाहेर गेल्यानंतर परतली नाही. कुटुंबीयांनी नातेवाईक, परिचित तसेच परिसरात तिचा शोध घेतला. मात्र, ती आढळून न आल्याने तिच्या बेपत्ता होण्याची माहिती संबंधित यंत्रणेला देण्यात आली. आज वर्धा नदीच्या किनारी तिच्या चपला आढळून आल्याची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी शोधमोहीम राबविण्यात आली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले. पथकाने नदीपात्र तसेच नदीकाठच्या परिसरात शोध घेतला. मात्र, रात्री उशिरापर्यंत संबंधित महिलेचा शोध लागला नसल्याची माहिती आहे.
महिलेने नदीत उडी घेतली असावी का, अथवा ती अन्य ठिकाणी गेली आहे, याबाबत अद्याप निश्चित माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे पोलिसांकडून विविध शक्यता तपासल्या जात असून, महिलेचा शोध घेण्यासाठी पुढील कार्यवाही सुरू आहे. दरम्यान, नदीकाठावर चपला आढळल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली असून, महिला सुखरूप सापडावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून तिच्या बेपत्ता होण्यामागील परिस्थितीचा तपास केला जात आहे.




Petrol Price




