निवृत्तीवेतनधारकांसाठी २० नोव्हेंबरला नागपुरात महामेळावा

- चेहरा प्रमाणीकरणाद्वारे डिजिटल हयात प्रमाणपत्र तयार करण्याची सुविधा; आधार कार्ड, पीपीओ क्रमांक, पासबुक व मोबाईल आणण्याचे आवाहन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना डिजिटल जीवन प्रमाणपत्र तयार करून देण्यासाठी नागपुरात २० नोव्हेंबर रोजी विशेष महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. देशव्यापी डिजिटल जीवन प्रमाणपत्र अभियानांतर्गत चेहरा प्रमाणीकरण (फेस ऑथेंटिकेशन) तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
वरिष्ठ कोषागार कार्यालय, जिल्हा अग्रणी बँक आणि नागपूर जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयीकृत बँकांच्या संयुक्त विद्यमाने नियोजन भवन येथे सकाळी १०.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत हा महामेळावा होणार आहे. प्रधान सचिव (लेखा व कोषागार) डॉ. रिचा बागला, डीओपीपीडब्ल्यूचे निदेशक डॉ. प्रमोद कुमार आणि लेखा व कोषागारे विभागाच्या संचालक दीपा देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या महामेळाव्यात सहभागी होणाऱ्या निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांचे ऑनलाइन हयात प्रमाणपत्र (डिजिटल लाइफ सर्टिफिकेट) तयार करून देण्यात येणार आहे. चेहरा प्रमाणीकरणाच्या आधुनिक सुविधेद्वारे ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार असून, यासाठी जिल्हा कोषागार कार्यालयाच्या वतीने आवश्यक मार्गदर्शन करण्यात येईल. त्यामुळे निवृत्तीवेतनधारकांना हयात प्रमाणपत्र सादर करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे.
महामेळाव्याचा लाभ घेण्यासाठी निवृत्तीवेतनधारकांनी आधार कार्ड, पीपीओ क्रमांक, बँक खाते पुस्तिका (पासबुक) आणि मोबाईल सोबत आणणे आवश्यक आहे. शिबिराच्या ठिकाणीच ऑनलाइन हयात प्रमाणपत्र तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण करून देण्यात येणार आहे.
डिसेंबर २०२६ चे निवृत्तीवेतन अदा करण्यासाठी ऑनलाइन हयात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असल्याने नागपूर जिल्ह्यातील सर्व पात्र शासकीय निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी या महामेळाव्यात सहभागी होऊन सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन वरिष्ठ कोषागार अधिकारी अमित मेश्राम यांनी केले आहे.




Petrol Price




