चिचोलीत जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड


- पाच जुगाऱ्यांना ताब्यात; १ लाख ३६ हजार ११० रुपयांचा मुद्देमाल जप्त
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / खापरखेडा : चिचोली (खापरखेडा) येथील टॉवर लाइनजवळील मैदानावर सुरू असलेल्या जुगारावर खापरखेडा पोलिसांच्या पथकाने रविवारी, ६ सप्टेंबर रोजी धाड टाकून पाच जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी रोख रक्कम, मोबाइल फोन आणि दुचाकी वाहनांसह एकूण १ लाख ३६ हजार ११० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, एक जण पोलिसांच्या कारवाईपूर्वी पसार झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिचोली येथील टॉवर लाइनजवळील मैदानावर काही जण जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी पाहणी केली असता तेथे जुगार सुरू असल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ धाड टाकून कारवाई केली.
या कारवाईदरम्यान साहिल जाकिर दुधकनोज ३० वर्षे, राहुल दादाराव निकोसे ४४ वर्षे, धर्मेंद्र ऊर्फ धर्मा अतिश्वर डोंगरे ३६ वर्षे, हसन खलील शेख ३२ वर्षे आणि रोहित नितलाल तुरकर २७ वर्षे या पाच जणांना ताब्यात घेण्यात आले. हे सर्व आरोपी चिचोली-खापरखेडा, ता. सावनेर येथील वॉर्ड क्रमांक १ मधील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, सचिन घोडेस्वार हा पोलिसांची चाहूल लागताच घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला.
रोख रक्कमेसह वाहने व मोबाइल जप्त -
धाडीदरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून ६ हजार ११० रुपये रोख, पाच मोबाइल फोन, तीन दुचाकी वाहने तसेच जुगार खेळण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य असा मुद्देमाल जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत १ लाख ३६ हजार ११० रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले.
कारवाईनंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून ताब्यात घेतलेल्या आरोपींविरुद्ध कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. जुगाराच्या माध्यमातून सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या प्रकारावर पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे परिसरातील अवैध जुगार व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र जुगार अधिनियमांतर्गत गुन्हा -
या प्रकरणी खापरखेडा पोलिसांनी महाराष्ट्र जुगार अधिनियमाच्या कलम १२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पसार झालेल्या सचिन घोडेस्वार याचा शोध घेण्यात येत असून, प्रकरणाचा पुढील तपास खापरखेडा पोलिसांकडून सुरू आहे.
चिचोली परिसरात सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या अवैध जुगाराच्या प्रकारावर पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. परिसरातील अवैध जुगार, सट्टा तसेच इतर गैरप्रकारांवर पोलिसांनी सातत्याने कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.




Petrol Price




