महत्वाच्या बातम्या

 कन्नमवार जलाशयाचे पाणी सोडल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा


- आमदार मिलिंद नरोटे यांच्या निर्देशानंतर रेगडी परिसरातील खोळंबलेल्या रोवण्यांना मिळणार गती; चामोर्शी तालुक्यात आनंदाचे वातावरण

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / चामोर्शी : रेगडी-हळदवाही जिल्हा परिषद क्षेत्रातील रेगडी येथील दीना धरण अर्थात कन्नमवार जलाशयाचे पाणी स्थानिक शेतकऱ्यांच्या मागणीनंतर सिंचनासाठी सोडण्यात आले. गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार मिलिंद भाऊ नरोटे यांनी शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेत संबंधित यंत्रणेला पाणी सोडण्याचे निर्देश दिल्यानंतर ही कार्यवाही करण्यात आली. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याअभावी रखडलेल्या भात पिकाच्या रोवण्यांना आता गती मिळणार असून चामोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे रेगडी परिसरातील शेतांमध्ये आवश्यक प्रमाणात पाणी उपलब्ध होत नव्हते. परिणामी अनेक शेतकऱ्यांच्या रोवण्या खोळंबल्या होत्या. पिकांची लागवड वेळेत पूर्ण करण्यासाठी शेतकरी मोटारपंपाच्या माध्यमातून शेतात पाणी आणून रोवणी करण्याचा प्रयत्न करीत होते.

मात्र, या पद्धतीने मोठ्या क्षेत्रावरील रोवणी पूर्ण करणे शेतकऱ्यांसाठी अडचणीचे ठरत होते. त्यामुळे कन्नमवार जलाशयातून पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून सातत्याने करण्यात येत होती.

या समस्येची दखल घेत आमदार मिलिंद भाऊ नरोटे यांनी दीना धरण-कन्नमवार जलाशयाचे पाणी सोडण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. मुंबईहून भ्रमणध्वनीवरून शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी मतदारसंघातील समस्त शेतकरी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन केले.

त्यानंतर भारतीय जनता पार्टी गडचिरोली जिल्हा व चामोर्शी मंडळ पदाधिकारी तसेच घोट सुभाष ग्राम मंडळ पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत घोट मार्गावरील गोलाबाई देवस्थान येथे पूजन करण्यात आले. त्यानंतर स्थानिक अभियंता विकास दूधबळे व उपअभियंता यांच्या प्रमुख उपस्थितीत कन्नमवार जलाशयातील पाण्याचे विधिवत पूजन करून जलाशयाचे पाणी सिंचनासाठी सोडण्यात आले.

पाणी सोडण्यात आल्याने रेगडी परिसरासह चामोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. रखडलेल्या रोवण्या पूर्ण करण्यासाठी जलाशयातील पाणी महत्त्वपूर्ण ठरणार असून, खरीप हंगामातील भात पिकाला यामुळे आधार मिळणार आहे. पाण्याची उपलब्धता झाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत असून आमदार नरोटे यांनी घेतलेल्या पुढाकाराचे शेतकऱ्यांकडून स्वागत करण्यात येत आहे.

भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती -
या वेळी राष्ट्रीय मानवाधिकार संघटन प्रदेश अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रणय भाऊ खुणे, माजी जि.प. सदस्य नामदेव सोनटक्के, घोट येथील सरपंच रूपाली ताई दूधबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.

यावेळी घोट मंडळ अध्यक्ष राकेश सरकार चामोर्शी मंडळ अध्यक्ष रोशनी ताई वरघंटे महामंत्री, संजय खेडेकर, विकास मैत्र, कविता किरमे, विलास उईके, राजेश्वर चुधरी, नीरज भाऊ रामानुजनवार, नरेश भाऊ अलसावार, श्रावण सोनटक्के, माणिक कोहळे प्रशांत पालारपवार, विनोद किरमे, रोहिदास धोटे, संतोष दूधबळे, आनंदराव सातपुते, सुमेन विश्वास, पलाश घरामी, महेश विश्वास, पोपट आभारे, सोम वैद्य, उपसरपंच मिहीर विश्वास, सुकंठ रॉय, प्रकाश सातपुते, तसेच राष्ट्रीय मानवाधिकार संघटन जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रोवणीला मिळणार वेग -
पावसाने ओढ दिल्याने रखडलेल्या रोवण्यांसाठी जलाशयाचे पाणी उपलब्ध झाल्याने आता शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. वेळेत पाणी उपलब्ध झाल्याने उर्वरित रोवणीचे काम पूर्ण करण्यास मदत होणार असून खरीप हंगामातील भात पिकाचे उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी या पाण्याचा मोठा फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos