महत्वाच्या बातम्या

 एक युद्ध नशे के विरुद्ध अभियानांतर्गत गडचिरोलीत जनजागृती बैठक : अंमली पदार्थांविरोधात पोलीस व शैक्षणिक संस्थांची संयुक्त मोहीम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : माओवादासारख्या गंभीर सुरक्षाविषयक आव्हानांचा यशस्वीपणे सामना करणारे गडचिरोली पोलीस दल आता समाजातील वाढत्या अंमली पदार्थांच्या धोक्याविरोधातही व्यापक जनजागृती मोहीम राबवत आहे. गृह मंत्रालय, भारत सरकार यांच्या नशामुक्त भारत-२०४७ अभियानांतर्गत सुरू असलेल्या एक युद्ध नशे के विरुद्ध या उपक्रमाच्या माध्यमातून गुरुवारी (३० जुलै) जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली. पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या विळख्यात जाण्यापासून रोखण्यासाठी पोलीस प्रशासन आणि शैक्षणिक संस्थांनी संयुक्तपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

समाजात अंमली पदार्थांचे वाढते प्रमाण रोखणे, शालेय विद्यार्थी आणि युवकांना व्यसनापासून दूर ठेवणे तसेच शैक्षणिक परिसर व्यसनमुक्त बनविणे हा या बैठकीचा प्रमुख उद्देश होता. विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि व्यसनाची सुरुवातीची लक्षणे वेळेत ओळखण्यासाठी शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी यावेळी सांगितले.

बैठकीत मुख्याध्यापकांशी संवाद साधताना विद्यार्थ्यांच्या वर्तनातील बदल, मानसिक स्थिती आणि व्यसनाची प्राथमिक लक्षणे ओळखून त्यांना योग्य वेळी समुपदेशन व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. पालक, शिक्षक आणि पोलीस प्रशासन यांनी समन्वयाने कार्य केल्यास विद्यार्थ्यांना व्यसनापासून दूर ठेवणे अधिक प्रभावीपणे शक्य होईल, असेही त्यांनी नमूद केले.

विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचार, शिस्त आणि निरोगी जीवनशैली विकसित करण्यासाठी शाळा व महाविद्यालयांमध्ये विविध जनजागृतीपर उपक्रम आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. व्यायाम, क्रीडा स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, पथनाट्य, वक्तृत्व स्पर्धा यांसारख्या उपक्रमांद्वारे व्यसनमुक्तीचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यावर भर देण्यात आला.

शाळा, महाविद्यालये आणि वसतिगृह परिसरात अंमली पदार्थांची विक्री अथवा संशयास्पद हालचालींबाबत गोपनीय माहिती मिळविण्यासाठी तक्रार पेटी उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या. या तक्रारींची माहिती संबंधित पोलीस ठाण्याला तातडीने देऊन आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले.

महाविद्यालयांमध्ये अँटी ड्रग कमिटी स्थापन करून वसतिगृहांमध्ये अँटी ड्रग सर्व्हेलन्स स्क्वॉड तयार करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. या समित्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये व्यसनासंदर्भातील संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे, आवश्यक ती माहिती संकलित करणे आणि पोलीस प्रशासनाशी सातत्याने समन्वय राखणे अपेक्षित आहे.

याशिवाय शाळा व महाविद्यालयांच्या परिसरातील संशयास्पद ठिकाणे, खाद्यपदार्थ विक्रीची दुकाने, कॅन्टीन, स्टेशनरी दुकाने याठिकाणी अंमली पदार्थांची विक्री होत नसल्याची नियमित खातरजमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. ऑनलाइन पार्सलद्वारे मागविण्यात येणाऱ्या वस्तूंवर तसेच ई-सिगारेटसारख्या नव्या व्यसनाधीन करणाऱ्या साधनांवर करडी नजर ठेवण्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाची लक्षणे आढळल्यास त्यांचे तातडीने समुपदेशन करण्यावरही भर देण्यात आला.

बैठकीच्या समारोपावेळी पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी आणि युवकांना शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन केले. निरोगी शरीर, व्यसनमुक्त जीवन, उत्तम आरोग्य आणि उज्ज्वल भवितव्यासाठी अंमली पदार्थांपासून दूर राहणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षणाच्या बळावर स्वतःचे, कुटुंबाचे आणि गडचिरोली जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने सजग राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

गडचिरोली पोलीस दलाने हाती घेतलेला हा उपक्रम केवळ अंमली पदार्थांविरोधातील कारवाईपुरता मर्यादित नसून, शैक्षणिक संस्था, पालक आणि समाज यांच्या सहभागातून व्यसनमुक्त, सुदृढ आणि जागरूक पिढी घडविण्याच्या दिशेने उचललेले महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos