महत्वाच्या बातम्या

 नीट व जेईई परीक्षेच्या तयारीसाठी २६७ आदिवासी विद्यार्थ्यांची निवड चाचणी उत्साहात संपन्न


- आदिवासी विकास विभागाचा पुढाकार; दहावीनंतर दोन वर्षे नामांकित संस्थांकडून मोफत मार्गदर्शन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय व अभियांत्रिकी क्षेत्रात अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी विकास विभागाने महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे. दहावी उत्तीर्ण आदिवासी विद्यार्थ्यांना नीट (NEET) आणि जेईई (JEE) या स्पर्धा परीक्षांसाठी दोन वर्षांचे विशेष प्रशिक्षण देण्यासाठी रविवारी १२ जुलै गडचिरोली येथील सेमाना बायपास रोडवरील शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेत निवड चाचणी परीक्षा घेण्यात आली. या चाचणीत जिल्ह्यातील २६७ विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली, अहेरी आणि भामरागड अंतर्गत दहावी उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना नामांकित खाजगी प्रशिक्षण संस्थांच्या माध्यमातून दोन वर्षे नीट आणि जेईई परीक्षांचे मार्गदर्शन देण्यात येणार आहे. या उपक्रमाचा उद्देश राज्यातील अधिकाधिक आदिवासी विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालये तसेच भारतीय तंत्रज्ञान संस्थांमध्ये (आयआयटी) प्रवेश मिळवून देणे हा आहे.

आदिवासी विकास विभाग, नागपूरचे अपर आयुक्त आयुषी सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अरुण एम. यांच्या नियंत्रणात या निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले.

३८२ विद्यार्थ्यांनी केली होती नोंदणी -
या निवड चाचणीसाठी दहावी उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जमातीच्या ३८२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५९ मुली आणि १०८ मुले, असे एकूण २६७ विद्यार्थी परीक्षेला उपस्थित राहिले.

यामध्ये नीटसाठी १६० तर जेईईसाठी १०७ विद्यार्थ्यांनी शंभर गुणांची निवड चाचणी दिली. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता आणि क्षमतेचे मूल्यमापन करून त्यांची पुढील प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येणार आहे.

तज्ज्ञ संस्थांकडून मिळणार दोन वर्षांचे प्रशिक्षण -
निवड झालेल्या विद्यार्थ्यांना नामांकित खाजगी प्रशिक्षण संस्थांकडून दोन वर्षे नियमित मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षांचे विशेष प्रशिक्षण, अभ्यास साहित्य आणि आवश्यक शैक्षणिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. या माध्यमातून ग्रामीण व दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांनाही उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा आदिवासी विकास विभागाचा प्रयत्न आहे.

अधिकाऱ्यांनी केली परीक्षा केंद्राची पाहणी -
परीक्षा सुरळीत आणि पारदर्शक वातावरणात पार पडली. परीक्षा केंद्राला भेट देऊन प्रकल्प कार्यालयातील सहाय्यक प्रकल्प अधिकारी (प्रशासन) वहिद शेख, नागपूर अपर आयुक्त कार्यालयातील सहाय्यक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) आर. बी. मेश्राम, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी एन. एम. पाळेकर तसेच वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक विनोद गायकवाड यांनी पाहणी केली.

अधिकारी व शिक्षकांचे सहकार्य -
या परीक्षेसाठी डॉ. प्रभू सादमवार आणि नरेंद्र कावळे यांनी नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली. मुख्याध्यापिका वंदना महल्ले यांनी केंद्राध्यक्ष म्हणून काम पाहिले, तर अतुल बलगुजर यांनी निरीक्षकाची भूमिका पार पाडली.

परीक्षेच्या यशस्वी आयोजनासाठी सुधीर शेंडे, एम. ई. ठाकूर, ए. एस. पोटे, के. एम. तिडके, बी. जे. रायपुरे, वाय. व्ही. भुरसे, किशोर बेझलवार, प्रशांत नागुलवार, मारोती कुनघाडकर, जी. टी. डोंगरवार, डी. डी. घोंगडे, व्ही. बी. मस्के, सी. एस. वानखेडे, रविकांत पिपरे, ज्ञानेश्वर निलेकर, जयश्री रामगीरवार, एस. आर. कोटांगले आणि एन. व्ही. कळंब यांनी पर्यवेक्षक म्हणून कार्य केले.

आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन उपलब्ध करून त्यांना वैद्यकीय आणि अभियांत्रिकी क्षेत्रात यशस्वी करण्यासाठी आदिवासी विकास विभागाचा हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.





  Print






News - Gadchiroli




Related Photos