महत्वाच्या बातम्या

 आरोग्य अमृत महोत्सवांतर्गत आज हिंगणघाट येथे महाआरोग्य शिबिर


-  ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याहस्ते उद्घाटन

-  पालकमंत्री व आरोग्य राज्यमंत्री उपस्थित राहणार

- दोन दिवस विनामुल्य आरोग्य तपासणी व चाचण्या

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या आरोग्य अमृत महोत्सवांतर्गत जिल्ह्यातील तिसरे महाआरोग्य शिबिर दिनांक १० व ११ ऑगस्ट रोजी अनुसया पॅलेस, हिंगणघाट येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन १० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्याहस्ते होणार आहे.

उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री डॅा.पंकज भोयर, आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, खासदार अमर काळे, आ.अभिजीत वंजारी, आ.सुधाकर अडबाले, आ.अरुण लखानी, आ.समीर कुणावार, आ.राजेश बकाने, आ.सुमित वानखेडे, जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, आरोग्य उपसंचालक डॅा.शशिकांत शंभरकर उपस्थित राहणार आहेत. दोन दिवस चालणाऱ्या या शिबिरात हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना विविध आजारांचे मोफत निदान, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला, औषधोपचार तसेच विविध शासकीय आरोग्य योजनांचा लाभ एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

शिबिरामध्ये ज्येष्ठ नागरिकांची तपासणी, हृदयरोग तपासणी, मेंदूरोग तपासणी, ईसीजी, स्त्रीरोग, दंतरोग, अस्थिरोग, कर्करोग, त्वचारोग, कान-नाक-घसा, नेत्ररोग, बालरोग, पोटाचे विकार तसेच संसर्गजन्य रोगांची तपासणी करण्यात येणार आहे. याशिवाय रक्त तपासणी, मानसिक आरोग्य सल्ला, औषध वितरण, मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात येणार आहे. शिबिरात आयुष्मान भारत योजनेंतर्गत कार्ड नोंदणी व लाभार्थी सहाय्य केंद्रही कार्यरत राहणार आहे.

महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र तपासणी कक्षांची व्यवस्था करण्यात आली असून नोंदणीपासून उपचार व औषध वितरणापर्यंत सर्व सुविधा नियोजनबद्ध पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. शिबिराच्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या तपासणीसाठी वेगवेगळी दालने राहणार आहे. शिबिरास येतांना नागरिकांनी आयुष्मान भारत कार्ड किंवा आधारकार्ड, रेशन व मोबाईल नंबर सोबत आणावा व शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॅा.सुमंत वाघ व जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा.स्वप्नील बेले यांनी केले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos