महत्वाच्या बातम्या

 दारूची वाहतूक करणारी जीप पोलिसांच्या ताब्यात १ लाख ८६ हजारांची दारू जप्त : दोघांना अटक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / आरमोरी : दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या जीपवर पोलिसांनी सापळा रचून कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले. ही कारवाई ६ ऑगस्ट रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास वेलोचना नदीच्या पुलावर करण्यात आली. या कारवाईत दारूसह जीप असा एकूण ८ लाख ८६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सुभाष वासुदेव तुलावी आणि अंकुश रतीराम मडावी दोघेही रा. दवंडी, ता. आरमोरी अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित दोघे एमएच ४९ बीबी-०३६५ क्रमांकाच्या जीपमधून वैरागडहून मानापूरच्या दिशेने दारूची वाहतूक करीत होते. या माहितीच्या आधारे पोलिसांनी वेलोचना नदीच्या पुलावर सापळा रचला. जीप पुलावर येताच पोलिसांनी ती थांबवून झडती घेतली. यावेळी जीपमध्ये १ लाख ८६ हजार ४०० रुपये किमतीची दारू आढळून आली.

पोलिसांनी दारूसह सुमारे ७ लाख रुपये किमतीची जीप जप्त केली. अशाप्रकारे एकूण ८ लाख ८६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध संबंधित कायद्यान्वये कारवाई करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत.





  Print






News - Gadchiroli




Related Photos