महत्वाच्या बातम्या

 धान पिकावर किडीचा प्रादुर्भाव : शेतशिवारात फवारणीला वेग


- जिल्ह्यात ७९ टक्के रोवणी पूर्ण, खोडकिडा, गादमाशी अन् पाने गुंडाळणाऱ्या अळीमुळे बळीराजा चिंतेत

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामातील बहुप्रतीक्षित धान रोवणी अंतिम टप्प्यात पोहोचली असून आतापर्यंत सुमारे ७९ टक्के रोवणी पूर्ण झाली आहे. मात्र, रोवणीची कामे आटोपताच धान पिकावर विविध किडींचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कोवळ्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी जिल्हाभरातील शेतशिवारात कीड व रोग नियंत्रणासाठी फवारणीच्या कामांना मोठा वेग आला आहे.

जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये धानाच्या कोवळ्या रोपांवर खोडकिडा, गादमाशी तसेच पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. अनेक ठिकाणी धानाची रोपे पिवळी पडत असून त्यांची वाढ खुंटत आहे. सतत बदलणारे हवामान, ढगाळ वातावरण आणि वाढलेली आर्द्रता यामुळे किडींचा प्रसार झपाट्याने होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे धान उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची आणि मोठ्या आर्थिक नुकसानीची भीती निर्माण झाली आहे.

किडीचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने शेतकरी तातडीने फवारणीकडे वळले आहेत. सकाळपासूनच शेतांमध्ये औषध फवारणी सुरू असून कृषी औषध विक्री केंद्रांवरही शेतकऱ्यांची मोठी गर्दी दिसून येत आहे. अनेक शेतकरी पिके वाचविण्यासाठी विविध कीटकनाशकांची खरेदी करत आहेत. मात्र, तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय औषधांचा वापर केल्यास खर्च वाढण्याबरोबरच अपेक्षित परिणाम मिळणार नाही, अशी भीती कृषी क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, कृषी विभागाने शेतकऱ्यांना एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करण्याचे आवाहन केले आहे. किडीच्या सुरुवातीच्या अवस्थेत प्रतिएकरी चार ते पाच कामगंध सापळे लावावेत. त्यामुळे किडीचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यास मदत होईल. प्रादुर्भाव अधिक असल्यास कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली क्लोरांट्रानिलीप्रोल किंवा कार्टाप हायड्रोक्लोराईड या शिफारस केलेल्या कीटकनाशकांची फवारणी करावी. फवारणी करताना स्वच्छ पाण्याचा वापर करावा तसेच औषधांचे प्रमाण शिफारशीनुसार ठेवावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

कृषी विभागाने केवळ रासायनिक फवारणीवर अवलंबून न राहता कामगंध सापळ्यांचा प्रभावी वापर करण्यावर भर दिला आहे. यामुळे किडीवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासोबतच अनावश्यक कीटकनाशकांचा वापर कमी होऊन उत्पादन खर्चात बचत होऊ शकते, असे विभागाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, वाढत्या किडीच्या प्रादुर्भावामुळे धान पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त होत असून बळीराजा चिंतेत आहे. कृषी अधिकाऱ्यांनी तातडीने शेतशिवारात भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी करावी, शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करावे तसेच शिफारस केलेल्या कीटकनाशकांची माहिती उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos