महत्वाच्या बातम्या

 वांगचुक यांच्या समर्थनार्थ आज जिल्हाभर जनआक्रोश : चंद्रपूर, चिमूर, मूल व बल्लारपूरात विविध आंदोलने


विदर्भ न्युज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या कार्यकाळात झालेल्या नीट परीक्षेतील कथित गैरव्यवस्थापन, पेपरफुटी, विद्यार्थ्यांचे प्रलंबित शैक्षणिक प्रश्न तसेच विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी उपोषणास बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी आज, सोमवार २० जुलै रोजी चंद्रपूर जिल्ह्यात विविध ठिकाणी जनआक्रोश मोर्चे, धरणे आंदोलन आणि लाक्षणिक उपोषणाचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील विविध विद्यार्थी संघटना, आंबेडकरी, सामाजिक, धार्मिक व राजकीय संघटनांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपूर शहरात दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र लक्षवेधी निदर्शन आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

आंदोलनादरम्यान नीट आणि टीईटी परीक्षांमधील कथित गैरव्यवहारांची स्वतंत्र व पारदर्शक चौकशी करण्यात यावी, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा तसेच दिल्ली येथे विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी उपोषण करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यात यावा, अशा प्रमुख मागण्या करण्यात येणार आहेत.

या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन प्रवीण खोब्रागडे, देशक खोब्रागडे, अशोक टेंभरे, अशोक फुलझेले यांच्यासह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. जिल्हाभरातील अनेक व्यापारी, शिक्षक आणि सामाजिक संघटनांनीही या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शविला आहे.

मूल येथे दिवसभर लाक्षणिक उपोषण -

मूल शहरात युवक काँग्रेसच्या वतीने गांधी चौकात सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. संतोषसिंह रावत आणि पवन निलमवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार असून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रश्नांकडे केंद्र सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात येणार आहे.

बल्लारपूरात धरणे आंदोलन -

बल्लारपूर शहरात सक्षम भारत या घोषवाक्याखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. विविध सामाजिक संघटना आणि नागरिक या आंदोलनात सहभागी होणार असून, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात येणार आहे.

चिमूरमध्ये जनआक्रोश मोर्चा -

चिमूर येथे दुपारी १२ वाजता हुतात्मा स्मारकापासून उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. शुभम मंडपे आणि प्रशांत कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या या मोर्चात विविध विद्यार्थी, युवक व सामाजिक संघटनांचा सहभाग राहणार असून, विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी सरकारविरोधात तीव्र आवाज उठविण्यात येणार आहे.

जिल्हाभरातील विविध संघटनांच्या सहभागामुळे आजचे आंदोलन व्यापक स्वरूप धारण करण्याची शक्यता असून, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसह सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos