नागपुरात निवासी डॉक्टरांचा लाक्षणिक संप : ओपीडी सेवा विस्कळीत, मागण्या मान्य न झाल्यास आजपासून बेमुदत आंदोलनाचा इशारा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल (एमएमसी) कडून सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी (सीसीएमपी) अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या होमिओपॅथी (बीएचएमएस) डॉक्टरांना नोंदणी देण्याच्या शासनाच्या प्रस्तावाविरोधात आणि निवासी डॉक्टरांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी नागपूरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) तसेच मेयो रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी बुधवारी एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारला. या आंदोलनाचा थेट परिणाम दोन्ही रुग्णालयांतील बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) सेवांवर झाला असून रुग्णांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागली.
शासकीय रुग्णालयांचा कणा मानल्या जाणाऱ्या निवासी डॉक्टरांनी कामबंद आंदोलन केल्याने एरवी गजबजलेल्या ओपीडीमध्ये रुग्णांची मोठी गैरसोय झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी वरिष्ठ व ज्येष्ठ डॉक्टरांनी ओपीडीची जबाबदारी स्वीकारली. मात्र, रुग्णांची वैद्यकीय माहिती नोंदविण्यापासून औषधोपचार सुचविण्यापर्यंतची सर्व कामे वरिष्ठ डॉक्टरांनाच करावी लागल्याने तपासणीचा वेग मंदावला. परिणामी तपासणी कक्षाबाहेर रुग्णांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अनेक रुग्णांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
आजपासून बेमुदत संपाचा इशारा -
बुधवारी करण्यात आलेला संप केवळ ओपीडी सेवांपुरता मर्यादित होता. मात्र शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास गुरुवारपासून बेमुदत संप पुकारण्यात येणार असल्याचा इशारा महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (मार्ड) संघटनेने दिला आहे.
मार्डच्या इशाऱ्यानुसार, गुरुवारपासून अपघात विभाग, आकस्मिक सेवा (इमर्जन्सी), शस्त्रक्रिया विभाग तसेच अतिदक्षता विभाग (आयसीयू) येथील सेवांमधूनही निवासी डॉक्टर बाहेर पडतील. तसे झाल्यास नागपूरसह संपूर्ण विदर्भातून उपचारासाठी येणाऱ्या गंभीर रुग्णांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता असून शासकीय रुग्णालयांतील आरोग्यसेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, आंदोलनादरम्यान मेयो व मेडिकल रुग्णालय परिसरात निवासी डॉक्टरांनी एकत्र येत घोषणाबाजी केली आणि शासनाच्या धोरणाविरोधात निदर्शने करून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले.
सीसीएमपी नोंदणी प्रक्रिया स्थगित करण्याची प्रमुख मागणी -
सेंट्रल मार्डचे महासचिव डॉ. आशुतोष आडे यांनी सांगितले की, संघटनेतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अंतिम निवेदन सादर करण्यात आले आहे. न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत सीसीएमपी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या बीएचएमएस डॉक्टरांना एमएमसीमध्ये नोंदणी देण्याची प्रक्रिया तात्काळ स्थगित करण्यात यावी, ही संघटनेची प्रमुख मागणी आहे.
याशिवाय निवासी डॉक्टरांची रिक्त पदे तातडीने भरावीत, सेवाशर्तींमध्ये सुधारणा करावी, विद्यावेतन वाढवावे, दर्जेदार निवास व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, कार्यस्थळी सुरक्षा सुनिश्चित करावी, शैक्षणिक सुविधा वाढवाव्यात तसेच इतर प्रलंबित मागण्यांवरही शासनाने त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी मार्डने केली आहे.
संघटनेने स्पष्ट केले आहे की, शासनाच्या पुढील भूमिकेनुसार आंदोलनाची दिशा निश्चित केली जाईल. त्यामुळे पुढील काही दिवसांत शासन आणि निवासी डॉक्टर यांच्यातील चर्चेकडे संपूर्ण आरोग्य यंत्रणा तसेच रुग्णांचे लक्ष लागले आहे.
News - Nagpur




Petrol Price




