महत्वाच्या बातम्या

 दक्षिण गडचिरोलीत पुन्हा पूरसंकट : आलापल्ली–सिरोंचा महामार्ग जलमय पूल पाण्याखाली , ५० गावे संपर्काबाहेर, वाहतूक ठप्प


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर दक्षिण गडचिरोलीत पावसाने पुन्हा जोरदार पुनरागमन केले असून, अहेरी व सिरोंचा तालुक्यांना मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला आहे. ३ ऑगस्टच्या रात्री झालेल्या संततधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला असून अनेक पूल आणि रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे दळणवळणाची व्यवस्था विस्कळीत झाली असून आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला आहे. पुसुकपल्लीजवळील पूल पाण्याखाली गेल्याने सुमारे ५० गावांचा संपर्क तुटल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी १०.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मात्र, दक्षिण भागात पावसाचा जोर अधिक राहिला. सिरोंचा तालुक्यात ७६.४ मिलिमीटर, तर अहेरी तालुक्यात ५०.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मुसळधार पावसामुळे अनेक रस्त्यांवर पाणी साचले असून काही पुलांवरून पाणी वाहत आहे.

परिणामी वाहतूक विस्कळीत झाली असून अनेक वाहने विविध ठिकाणी अडकून पडली आहेत. काही वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर केला असला तरी अनेक मार्गही पाण्याखाली गेल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले.

चार दिवसांत दुसऱ्यांदा अतिवृष्टीचा तडाखा बसल्याने परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सखल भागातील शेतीत पाणी साचल्यामुळे उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मुसळधार पावसामुळे आलापल्ली–सिरोंचा महामार्गावरील टेकमपल्लीजवळील पर्यायी रस्ताही पाण्याखाली गेला असून या मार्गाला अक्षरशः तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

पेंटीपाक्यात सर्वाधिक १०३ मिमी पावसाची नोंद -

दक्षिण गडचिरोलीतील विविध पर्जन्यमापक केंद्रांमध्ये जोरदार पावसाची नोंद झाली. पेंटीपाका येथे सर्वाधिक १०३ मिलिमीटर पाऊस झाला. त्याखालोखाल असरअल्ली येथे ८२.४, बामणी येथे ७८, आलापल्ली येथे ७१.२ आणि अहेरी मंडळात ६८.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

महामार्ग ठप्प; प्रवाशांचे हाल -

आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावरील अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक पूर्णपणे प्रभावित झाली आहे. काही पुलांवरून पाणी वाहत असल्याने वाहनचालकांना पुढे जाणे धोकादायक ठरत आहे. महामार्ग बंद झाल्याने दळणवळणावर मोठा परिणाम झाला असून नागरिकांना आणि प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos