महत्वाच्या बातम्या

 वेदनाग्रस्तांच्या सेवेतच ईश्वरीय सेवेचा परमोच्च आनंद – विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार


- नवरगाव येथे अत्याधुनिक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे लोकार्पण

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : सामान्य नागरिकांना दर्जेदार आणि वेळेवर आरोग्य सेवा मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. आजारी, गरजू आणि वेदनाग्रस्तांच्या सेवेतच खरी ईश्वरसेवा आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सुविधा पोहोचविण्यासाठी शासनाने उभारलेल्या प्रत्येक आरोग्य केंद्राचा जनहितासाठी प्रभावी वापर झाला पाहिजे असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी केले.

ते नवरगाव येथे शनिवार १ ऑगस्ट २०२६ रोजी नव्याने उभारण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यास अध्यक्ष म्हणून बोलत होते. आयोजित लोकार्पण सोहळ्यास अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अशोक कटारे,जि.प.बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मटाले, सुनीतभाऊ उनाडकट, तालुका काँग्रेस अध्यक्ष रमाकांत लोधे, सरपंच राहुल बोडने, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रफुल सुने, यांचेसह आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच नवरगाव येथील काँग्रेस कार्यकर्ते ग्रामस्थ व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यापुढे बोलतांना आ. वडेट्टीवार म्हणाले की, ग्रामीण भागातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी आधुनिक सोयी-सुविधांनी सुसज्ज आरोग्य केंद्रांची उभारणी आवश्यक आहे. नवीन इमारतीमुळे परिसरातील हजारो नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध होणार असून, माता-बाल संगोपन, लसीकरण, आपत्कालीन उपचार आणि विविध आरोग्य योजनांचा लाभ अधिक प्रभावीपणे मिळेल.

यावेळी त्यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना नागरिकांशी संवेदनशीलतेने वागण्याच्या सूचना देत औषधांचा पुरेसा साठा, आवश्यक वैद्यकीय उपकरणे आणि डॉक्टर-कर्मचाऱ्यांची नियमित उपस्थिती सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले. ग्रामीण भागातील रुग्णांना उपचारासाठी विनाकारण मोठ्या शहरात जावे लागू नये, यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र सक्षम करण्यावर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर, सिंदेवाही गटविकास अधिकारी आत्मज मोरे,तालुका काँग्रेस अध्यक्ष रमाकांत लोधे, सरपंच राहुल बोडने या मान्यवरांनीही नवीन इमारतीमुळे परिसरातील आरोग्य सेवेला मोठी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. लोकार्पणानंतर आ. विजय वडेट्टीवार यांनी नव्या इमारतीची पाहणी करून विविध विभागांची माहिती घेतली तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधत सदर प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येत असलेल्या एकूण २१ गावातील सुमारे ३४ हजार नागरिकांना दर्जेदार सेवा देण्याचे आवाहन केले.

नवरगाव परिसरातील नागरिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्राची नवीन इमारत सुरू झाल्याबद्दल समाधान व्यक्त करत ही सुविधा ग्रामीण भागासाठी वरदान ठरणार असल्याची भावना व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे यांनी केले  संचालन भागेश टेंभुर्ने तर आभार तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रफुल सुने यांनी मानले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.





  Print






News - Chandrapur




Related Photos