महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट अधिकारी कर्मचारी व लाभार्थ्यांचा गौरव


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : महाराष्ट्र महसूल दिनानिमित्त आज शनिवार जिल्हा नियोजन भवन, चंद्रपूर येथे जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, भूमी अभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक प्रदीप जगताप, तहसीलदार विजय पवार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम यांनी प्रास्ताविकातून महसूल विभागाच्या कार्याचा आढावा घेतला.
यावेळी प्रमुख मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी, महसूल विभाग हा शासनाचा सर्वाधिक लोकाभिमुख विभाग असून नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असंख्य जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडत असल्याचे सांगितले. शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविणे, नैसर्गिक आपत्ती, पूर परिस्थिती, जनगणना, निवडणुका, अतिक्रमण प्रकरणे, पट्टे वाटप, नियमाकूल प्रकरणांचा निपटारा, पाणंद रस्ते योजना, संजय गांधी निराधार योजना आदी विविध कामांद्वारे महसूल विभाग नागरिकांना न्याय देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करीत असल्याचे त्यांनी नमूद केले.
शहरी असो वा ग्रामीण भाग, नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी ग्रामस्तरावर तलाठी व मंडळ अधिकारी, तालुका स्तरावर तहसीलदार आणि उपविभागीय स्तरावर उपविभागीय अधिकारी हे अधिकारी-कर्मचारी चोवीस तास तत्परतेने कार्यरत असतात. कोणत्याही अडचणीच्या वेळी नागरिकांनी संपर्क साधल्यास त्वरित प्रतिसाद देऊन त्यांच्या समस्यांचे प्रथम प्राधान्याने निराकरण करण्यासाठी महसूल प्रशासन सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार यांनीही उपस्थितांना महसूल दिनाच्या शुभेच्छा देत महसूल विभागाच्या लोकाभिमुख कार्याची माहिती दिली.
महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच उत्कृष्ट मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ), पोलीस पाटील, संजय गांधी योजनेचे लाभार्थी तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा प्रमाणपत्रे देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन व आभार सहायक महसूल अधिकारी अजय मेकलवार यांनी केले. यावेळी महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी, स्वस्त धान्य दुकानदार, पोलीस पाटील, आशा सेविका, संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी, मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ), सहाय्यक कर्मचारी तसेच विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
News - Chandrapur




Petrol Price




