महत्वाच्या बातम्या

 गोठणगाव जंगलात अवैध मोहफूल दारूभट्टीवर पोलिसांची धाड : एक आरोपी जेरबंद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : गोठणगाव जंगल परिसरात मोहफुलापासून अवैधरित्या दारू तयार केली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर शुक्रवारी धाड टाकून एका आरोपीला रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे साहित्य व अन्य संबंधित मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिस उपनिरीक्षक दयानंद भोंबे यांनी पोलिस हवालदार कालिदास मडावी व पोलिस शिपाई नंदकिशोर मेश्राम यांच्यासह गोठणगाव जंगल परिसरात शोधमोहीम राबविली. शोधमोहीमेदरम्यान जंगलातील एका ठिकाणी मोहफुलापासून अवैध दारू तयार केली जात असल्याचे निदर्शनास आले.

यावेळी दिनकर टेमसू मोहने ४२ वर्षे हा मोहफूल दारूभट्टी चालविताना आढळून आला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्याला घटनास्थळीच रंगेहाथ ताब्यात घेतले. धाडीदरम्यान दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे साहित्य, उपकरणे तसेच अन्य संबंधित मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू असून अवैध दारूनिर्मिती व विक्रीविरोधातील मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. अशा बेकायदेशीर व्यवसायांवर भविष्यातही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos