छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान

- समाधान शिबिराचा लाभ घेण्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांचे आवाहन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : शासनाने महसूल विभाग अधिक लोकाभिमुख, पारदर्शक व गतीमान करण्यासाठी महसूल विभागाच्या विविध सेवा, दाखले, प्रमाणपत्रे, शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ तसेच महसूल विषय तक्रारीरीचे त्वरीत निराकरण नागरिकांना एकाच ठिकाणी एकाच छताखाली उपलब्ध करुन देण्यासाठी व तळागाळातील शेवटच्या नागरिकांपर्यंत लाभ पोहोचविण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या जन्मदिवसानिमित्त व माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून महसूलमत्री चंद्रशेखर बावनकुळे व जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्या संकल्पनेतून २२ जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यातील चारही विधानसभा क्षेत्रात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना राबविण्यात येत आहे.
या अभियानांतर्गत समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. वर्धा विधानसभा क्षेत्रातील विकास भवन वर्धा येथे १ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या समाधान शिबिरात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले आहे.
विकास भवन येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरामध्ये प्रामुख्याने राज्यातील महिलांना शेतकरी दर्जा देण्याबाबत शासनाने निर्णय घेतला असून त्यानुसार प्रमाणपत्र वाटप, गावठाणातील नागरीकांना स्वामित्व सनद, मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना, शासकीय जमीनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करणे, तुकडेबंदी कायद्याअंतर्गत स्थानिक क्षेत्र घोषित करणे, जिवंत सातबारा मोहिमेची अंमलबजावणी करणे, सिंधी विस्थापितांच्या निवासी व व्यावसायिक जमीनी फ्रि- होल्ड करण्यासाठी विशेष अभय योजना - २०२५ ला एक वर्ष मुदतवाढ देणे, राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना लाभ, घरकुल योजनेच्या लाभार्थ्यासाठी विशेष तरतुद, कुंभार समाजाला पारंपारीक व्यवसायासाठी सवलती, शेत जमीनीच्या कौटुंबिक वाटणी पत्रावरील नोंदणी शुल्क पूर्णपणे माफ करणे या सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
सर्वासाठी घरे याकरीता प्रस्ताव तयार करणे, सातबारा मधील चुका दुरुस्त करणे, प्रलंबित फेरफार प्रकरणे निकाली काढणे, मुख्यमंत्री बळीराजा शेत/पांदण रस्ते योजनेंतर्गत क्लस्टर करीता शेत पांदन रस्त्याची निवड करणे, ई-मोजणी, ॲग्री स्टॅक, पीएमकिसान सेवा उपलब्ध करुन देणे, भूसंपादन व अकृषक सुधारीत सुधारणे बाबत मार्गदर्शन करणे, सामाजिक अर्थसहाय्य योजनेचा लाभ देणे, भोगवटदार वर्ग २ चे १ मध्ये रुपांतर करणे, तुकडेबंदी व्यवहारविरुध्द अकृषक झालेले व्यवहार फेरफार घेणे, एक खिडकी योजनेंतर्गत प्राप्त अर्जावर तात्काळ कार्यवाही करणे, जातीची प्रमाणपत्र, नॉनक्रिमिनल, रहिवासी प्रमाणपत्र, शपथपत्र प्रमाणपत्र उपलब्ध करुन देणे, शिधापत्रिका तयार करुन वाटप करणे, शिधापत्रिकेत नाव समाविष्ठ करणे व शिधापत्रिकेतील नाव कमी करुन प्रमाणपत्र देणे आदी सेवा शिबिरात उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.नागरिकांनी आवश्यक मुळ कागदपत्रे व छायांकित प्रतीसह उपस्थित राहून योजनांचा व सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
News - Wardha




Petrol Price




