भरधाव दुचाकीची एसटी बसला धडक : चालकासह प्रवासी जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : मोहाडी तालुक्यातील निलज (बु.) ते मोहगाव दरम्यानच्या रस्त्यावर भरधाव वेगाने जाणाऱ्या मोटारसायकलने एसटी बसला जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात मोटारसायकल चालकासह मागे बसलेला प्रवासी जखमी झाला आहे. ही घटना २६ जुलै रोजी रात्री ७ वाजून ५० मिनिटांच्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार, तुमसर आगाराची एसटी बस क्रमांक एमएच ४० एन २५६७ घेऊन चालक राजेश बाबूराव ठवकर हे तुमसरहून जांभोरा मार्गावर जात होते. दरम्यान, निलज (बु.) ते मोहगाव दरम्यानच्या डांबरी रस्त्यावर समोरून येणाऱ्या मोटारसायकल क्रमांक एमएच ३६ पी ६३३१ वरील चालकाने निष्काळजीपणे व भरधाव वेगाने वाहन चालविले.
दुचाकी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने मोटारसायकल एसटी बसच्या उजव्या बाजूच्या मागील पत्र्याला जाऊन आदळली. या धडकेत मोटारसायकल चालक व त्याच्या मागे बसलेला प्रवासी जखमी झाले.
या अपघातास दुचाकी चालकाचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी एसटी बसचालक राजेश बाबूराव ठवकर यांच्या तक्रारीवरून करडी पोलिसांनी मोटारसायकल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास करडी पोलीस करीत आहेत.
News - Bhandara




Petrol Price




