१२५ गुन्ह्यांतील २४ लाखांचा देशी दारू साठा राजुरा पोलिसांकडून नष्ट

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : अवैध मद्यविक्रीविरोधात राजुरा पोलिसांनी मोठी कारवाई करत विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेल्या देशी दारूचा साठा नष्ट केला. पोलिस स्टेशन राजुरा येथे कायदेशीर परवानगी प्राप्त झाल्यानंतर ही प्रक्रिया पार पडली. या कारवाईत एकूण १२५ गुन्ह्यांतील २४ लाख ८८ हजार ९३० रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.
माहितीनुसार, आदेश क्रमांक DET/११२०२५/जमुवी/शाखा-३, चंद्रपूर ०७ नोव्हेंबर २०२५ अन्वये ७४ गुन्ह्यांतील मुद्देमाल तसेच आदेश क्रमांक DET/११२०२५/जमुवी शाखा-३/२१७३-१२४३, चंद्रपूर १८ जुलै २०२५ अन्वये ५४ गुन्ह्यांतील मुद्देमाल नष्ट करण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी नियमानुसार कारवाई केली.
सदर कारवाई पोलिस निरीक्षक आशिफराजा शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक लोकरे, मुद्देमाल मोहरर देवाजी टेकाम तसेच राज्य उत्पादन शुल्क विभाग, राजुरा येथील दुय्यम निरीक्षक भिवगडे उपस्थित होते.
दोन पंचांच्या उपस्थितीत जेसीबी व ट्रॅक्टरच्या सहाय्याने देशी दारूचा साठा पूर्णपणे नष्ट करण्यात आला. संपूर्ण कारवाईची फोटोग्राफी व व्हिडिओग्राफी करण्यात आली असून सर्व प्रक्रिया पंचांच्या समक्ष पारदर्शक पद्धतीने पूर्ण करण्यात आली. यानंतर पोलिस अधिकारी, उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आणि पंच यांच्या उपस्थितीत सविस्तर पंचनामा तयार करण्यात आला.
राजुरा पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
News - Chandrapur




Petrol Price




