१७ वर्षे सुरक्षा यंत्रणांना गुंगारा देणारा माओवादी नेता मिसिर बेसरा अखेर जेरबंद : लाल चळवळ नेतृत्वहीन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : शेकडो जवानांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला आणि गेली तब्बल १७ वर्षे सुरक्षा यंत्रणांना गुंगारा देणारा प्रतिबंधित भारतीय कम्युनिस्ट पक्ष (माओवादी) संघटनेचा शेवटचा सक्रिय पॉलिट ब्युरो सदस्य मिसिर बेसरा याला झारखंडमधील गिरिडीह परिसरातून संयुक्त सुरक्षा दलांनी मध्यरात्री सापळा रचून जेरबंद केले. या ऐतिहासिक कारवाईमुळे कथित लाल चळवळ पूर्णपणे नेतृत्वहीन झाली असून, देशातून माओवादाचे उच्चाटन करण्याच्या दिशेने हे सर्वांत मोठे यश मानले जात आहे.
गृहमंत्र्यांच्या आदेशानंतर सुरक्षा यंत्रणांनी आवळला फास -
देशातील नक्षलवादाचे समूळ उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जाहीर केल्यानंतर झारखंड, ओडिशा आणि छत्तीसगडच्या सीमावर्ती जंगलांमध्ये सुरक्षा दलांनी व्यापक मोहीम हाती घेतली होती. मोस्ट वाँटेड माओवादी नेता मिसिर बेसरा याला पकडण्यासाठी तब्बल पाच हजारांहून अधिक जवान तैनात करण्यात आले होते, तर त्याच्या शोधासाठी सुमारे नऊ हजार मोहिमा राबविण्यात आल्या. या काळात सुरक्षा यंत्रणांनी त्याची पुरवठा साखळी आणि रसद व्यवस्था पूर्णपणे खंडित केली. त्यामुळे बेसरा आणि त्याच्या उरलेल्या साथीदारांची मोठी कोंडी झाली होती.
कुटुंबीयांचे भावनिक आवाहनही निष्फळ -
सुरक्षा यंत्रणांनी बेसराला शरण येण्यासाठी त्याचा मुलगा आणि भावामार्फत पत्र पाठवून शस्त्रे खाली ठेवण्याचे भावनिक आवाहन केले होते. मात्र, त्याने हे आवाहन धुडकावून लावत जंगलातील वास्तव्यास कायम ठेवले. अखेर सुरक्षा दलांच्या सातत्यपूर्ण आणि नियोजनबद्ध कारवाईपुढे त्याला शरण जाण्याऐवजी अटक होण्याची वेळ आली.
शिक्षणाच्या वयातच माओवादाकडे वळला -
मिसिर बेसरा शिक्षण घेण्याच्या वयातच जहाल डाव्या विचारसरणीकडे आकर्षित झाला आणि १९८० च्या दशकात भूमिगत झाला. त्यानंतर झारखंड, बिहार, ओडिशा आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये त्याने माओवादी कारवायांचे नेतृत्व केले. त्याच्याविरुद्ध विविध राज्यांमध्ये तब्बल १५० हून अधिक गंभीर गुन्हे दाखल असून, राष्ट्रीय तपास यंत्रणेसाठी (एनआयए) देखील तो मोस्ट वाँटेड आरोपी होता.
न्यायालयावर हल्ला करून केली होती सुटका -
२००७ मध्ये खुंटी पोलिसांनी मिसिर बेसराला अटक करण्यात यश मिळविले होते. मात्र, २००९ मध्ये बिहारमध्ये न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान माओवाद्यांनी सशस्त्र हल्ला करून त्याची सुटका केली होती. त्यानंतर तो पुन्हा भूमिगत झाला आणि अनेक वर्षे सुरक्षा यंत्रणांच्या हाती लागला नव्हता.
साथीदारांच्या शरणागतीमुळे वाढली अडचण -
गेल्या काही महिन्यांपासून बेसरा सातत्याने सुरक्षा दलांना हुलकावणी देत होता. मात्र, मे महिन्यात त्याच्यासोबत कार्यरत असलेल्या २७ माओवाद्यांनी झारखंड पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. त्यानंतर २८ जुलै रोजी त्याच्या अंगरक्षकासह आणखी २४ माओवादी शरण आल्याने त्याची संघटनात्मक ताकद मोठ्या प्रमाणात खिळखिळी झाली. पुरवठा मार्ग बंद झाल्याने अन्नटंचाईलाही त्याला सामोरे जावे लागले आणि त्याची हालचाल मर्यादित झाली.
याच परिस्थितीचा अचूक फायदा घेत संयुक्त सुरक्षा दलांनी मध्यरात्री धावत्या वाहनावर नियोजनबद्ध धाड टाकली. या कारवाईत मिसिर बेसरासह त्याचे दोन साथीदार – मेहनत उर्फ मोचू आणि गौरव – यांना ताब्यात घेण्यात आले.
माओवादाविरोधातील लढ्याला मोठे यश -
मिसिर बेसराच्या अटकेमुळे प्रतिबंधित भारतीय कम्युनिस्ट पक्ष (माओवादी) संघटनेच्या सर्वोच्च नेतृत्वालाच मोठा धक्का बसला आहे. संघटनेचा शेवटचा सक्रिय पॉलिट ब्युरो सदस्य जेरबंद झाल्याने माओवादी चळवळ नेतृत्वहीन झाल्याचे मानले जात असून, देशातील माओवादाच्या उच्चाटनाच्या दिशेने ही कारवाई ऐतिहासिक आणि निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




