बल्लारपूर येथून चोरी झालेली दुचाकी चंद्रपुरात जप्त : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : बल्लारपूर येथून चोरीस गेलेली बजाज पल्सर २२० मोटारसायकल अवघ्या काही दिवसांत शोधून काढत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्ह्याचा छडा लावला आहे. या कारवाईत चोरीस गेलेली सुमारे ५० हजार रुपये किमतीची दुचाकी जप्त करण्यात आली असून एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, बल्लारपूर येथील एका नागरिकाने आपली बजाज पल्सर २२० मोटारसायकल २० जुलै २०२६ रोजी बॅटरी बदलण्यासाठी गॅरेजमध्ये ठेवली होती. मात्र, नंतर गाडी घेण्यासाठी गेल्यावर ती तेथे आढळून आली नाही.
दरम्यान, २७ जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला चोरीस गेलेली मोटारसायकल विक्री करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार चंद्रपूर शहरातील दूध डेअरी परिसरात सापळा रचून कारवाई करण्यात आली. या कारवाईत एका विधीसंघर्षग्रस्त बालकाकडून चोरीस गेलेली बजाज पल्सर २२० मोटारसायकल जप्त करण्यात आली.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी व अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक बलराम झाडोकार, उपनिरीक्षक सर्वेश बेलसरे, पोलीस हवालदार सुभाष गोहोकार, सचिन गुरनुले, रजनीकांत पुट्टावार तसेच पोलीस अंमलदार प्रतीक हमके, विठ्ठल काकडे, प्रफुल्ल पुप्पलवार आणि दिनेश अराडे यांनी केले.
News - Chandrapur




Petrol Price




