महत्वाच्या बातम्या

 अहेरी येथे वृद्ध कलावंत तपासणी समिती दाखल : पात्र कलाकारांना लवकरच मिळणार मासिक मानधन


- आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या पुढाकारातून तपासणी शिबिराचे आयोजन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / अहेरी : महाराष्ट्र शासनाच्या राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार सन्मान योजनेअंतर्गत वृद्ध कलावंतांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी तपासणी समितीने अहेरी येथे भेट देत पंचायत समितीच्या सभागृहात शनिवारी २५ जुलै तपासणी शिबिर आयोजित केले. आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या पुढाकारातून हे शिबिर पार पडले असून, त्यामुळे अहेरी व सिरोंचा तालुक्यातील अनेक वृद्ध कलावंतांना दिलासा मिळाला आहे.

या तपासणी शिबिरात वृद्ध कलावंतांनी आवश्यक कागदपत्रे समितीसमोर सादर केली. समितीने अर्जांची व कागदपत्रांची सविस्तर पडताळणी करून पात्र लाभार्थ्यांची नोंद केली.

यावेळी समितीमध्ये सहाय्यक गटविकास अधिकारी तथा नोडल अधिकारी सुरेंद्र गोंगले, विस्तार अधिकारी (मुलचेरा) मंगल डाखरे, कुरखेडा येथील सचिन मांडवगडे, अशासकीय सदस्य संदीप राऊत, धनपाल कार, राजेंद्र बोबाटे, नारायण मंडल तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार उपस्थित होते.

महाराष्ट्र शासनाची वृद्ध कलावंत मानधन योजना आता राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार सन्मान योजना या नावाने राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत ५० वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेल्या गरजू व पात्र कलाकारांना शासनाकडून आर्थिक सहाय्य दिले जाते.

अहेरी तालुक्यातील अहेरी, गोविंदगाव, मरपली, सुधागुडम आदी गावांसह सिरोंचा तालुक्यातील अनेक गावांतील कलावंतांनी या शिबिरात सहभाग घेत कागदपत्रे तपासणीसाठी सादर केली. तपासणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र ठरणाऱ्या कलाकारांना शासनाकडून दरमहा रु.५ हजार इतके मानधन मिळणार आहे.

या उपक्रमामुळे दुर्गम भागातील ज्येष्ठ व लोककला जपणाऱ्या कलाकारांना आर्थिक आधार मिळणार असल्याने कलावंतांनी आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांचे आभार व्यक्त केले. शासनाच्या या योजनेमुळे ज्येष्ठ कलाकारांच्या सन्मानासह त्यांच्या आर्थिक स्थैर्यालाही हातभार लागणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.





  Print






News - Gadchiroli




Related Photos