गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर : वीज कोसळून मच्छीमाराचा मृत्यू


- मुत्तापूर रपटा वाहून गेला, पोहार नदी परिसरात दोन ट्रक उलटले; दक्षिण भागात जनजीवन विस्कळीत
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : बुधवारी (१ जुलै) संध्याकाळी जिल्ह्याच्या दक्षिण भागात झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. चामोर्शी तालुक्यातील रेगडी येथील कर्मवीर कन्नमवार जलाशय परिसरात मासेमारीसाठी गेलेल्या एका मच्छीमाराचा वीज कोसळून मृत्यू झाला. तर बोरी–आलापल्ली मार्गावरील मुत्तापूर येथील नाल्यावरील तात्पुरता रपटा वाहून गेल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. तसेच चामोर्शी–गडचिरोली मार्गावरील पोहार नदी पुलाजवळील पोचमार्गावर चिखलात फसून दोन ट्रक उलटल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मच्छीमारावर वीज कोसळली; उपचारादरम्यान मृत्यू -
रेगडी परिसरातील कन्नमवार जलाशयात विकासपल्ली येथील अखिल बिस्वास (वय ५५), दीपक बिस्वास, निर्मल बिस्वास आणि चंद्रशेखर मंडल हे मासेमारीसाठी गेले होते. अचानक पाऊस सुरू झाल्याने चौघांनी जवळील झाडाचा आश्रय घेतला. त्याचवेळी झाडावर वीज कोसळल्याने चौघेही गंभीर जखमी झाले.
त्यांना तातडीने रेगडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. अखिल बिस्वास यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी घोट येथील रुग्णालयात हलविण्यात येत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
मुत्तापूर रपटा वाहून गेला; वाहतूक विस्कळीत -
बोरी–आलापल्ली मार्गावरील मुत्तापूर येथील नाल्यावरचा तात्पुरता रपटा मुसळधार पावसामुळे वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. अहेरी आगाराच्या बसेसना पर्यायी मार्गाने मुलचेरा मार्गे अहेरीकडे वळविण्यात आले, त्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. रस्त्यांवर अनेक ठिकाणी झाडे पडल्याने वाहतुकीला अडथळे निर्माण झाले.
पोहार नदी परिसरात दोन ट्रक उलटले -
दरम्यान, चामोर्शी–गडचिरोली मार्गावरील पोहार नदी पुलाजवळील पोचमार्गावर मोठ्या प्रमाणात चिखल साचल्याने दोन मालवाहू ट्रक घसरून उलटले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. स्थानिकांच्या मदतीने वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.
दक्षिण गडचिरोलीत पावसाचा जोर कायम -
भामरागड, सिरोंचा, एटापल्ली, अहेरी आणि चामोर्शी तालुक्यांसह जिल्ह्याच्या दक्षिण भागात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाची नोंद झाली. नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून ग्रामीण भागातील जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे.
भामरागडमध्ये सर्वाधिक ७२.७ मिमी पाऊस -
मागील २४ तासांत भामरागड तालुक्यात सर्वाधिक ७२.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल सिरोंचा तालुक्यात ३१.४ मिलिमीटर पाऊस झाला. तर मुलचेरा तालुक्यात सर्वात कमी ०.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. दिवसभर जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. सकाळ व संध्याकाळी हलक्या ते मध्यम सरींनी हजेरी लावली.
प्रशासनाचे आवाहन -
पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने नागरिकांना नद्या-नाल्यांच्या परिसरात जाणे टाळावे, झाडाखाली आश्रय घेऊ नये तसेच अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन केले आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




