आषाढी एकादशीच्या सुटीचा फायदा : ब्रह्मपुरीतील बार फोडून २.१३ लाखांचा ऐवज लंपास


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : आषाढी एकादशीच्या दिवशी बार बंद असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी ब्रह्मपुरी तालुक्यातील रुई येथील उज्ज्वल बार अँड रेस्टॉरंटमध्ये धाडसी चोरी केली. बारच्या मागील बाजूचे शटर फोडून आत प्रवेश करत चोरट्यांनी विदेशी मद्य, बिअर, ३२ इंचांचा एलईडी टीव्ही आणि रोख रक्कम असा २ लाख १३ हजार २२७ रुपयांचा ऐवज लंपास केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रुई येथील रहिवासी तथा उज्ज्वल बार अँड रेस्टॉरंटचे मालक अमित दादाजी वनकर ३९ वर्ष यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आषाढी एकादशी निमित्त २५ जुलै रोजी बार पूर्ण दिवस बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे ते कुटुंबीयांसह आंभोरा येथे फिरण्यासाठी गेले होते. रात्री उशिरा गावी परतल्यानंतर बार बाहेरून व्यवस्थित दिसत असल्याने कोणताही संशय आला नव्हता.
रविवारी २६ जुलै रोजी सकाळी सुमारे ९ वाजता अमित वनकर यांचे भाऊ अतिश वनकर हे कामानिमित्त बारमध्ये गेले असता मागील बाजूचे दोन्ही शटर अर्धवट उघडे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ बारचे व्यवस्थापक अश्विन टेंभुर्णे आणि अमित वनकर यांना याची माहिती दिली. त्यानंतर सर्वजण घटनास्थळी पोहोचले. समोरील शटर उघडून आत प्रवेश केला असता काऊंटरमधील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. चोरी झाल्याचा संशय आल्याने ब्रह्मपुरी पोलिसांना तत्काळ माहिती देण्यात आली.
पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असता चोरट्यांनी मागील शटर तोडून बारमध्ये प्रवेश केल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी विविध कंपन्यांच्या बिअरच्या शेकडो बाटल्या, रॉयल स्टॅग, रॉयल चॅलेंज, नंबर वन, ब्लेंडर्स प्राईड, ग्लेन वॉक, सह्याद्री व्हिस्की आदी विदेशी मद्याच्या बाटल्या, ३२ इंचांचा एलईडी टीव्ही तसेच काऊंटरमध्ये ठेवलेली ₹११ हजारांची रोख रक्कम चोरून नेल्याचे आढळून आले. चोरीस गेलेल्या मालाची एकूण किंमत २ लाख १३ हजार २२७ रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
घटनेची गंभीर दखल घेत ब्रह्मपुरी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. घटनास्थळावरील पुरावे, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू असून लवकरच आरोपींना जेरबंद करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.पुढील तपास ब्रम्हपुरी पोलीस स्टेशन चे ठाणेदार प्रमोद बनबाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मनोज खडसे करीत आहे.
News - Chandrapur




Petrol Price




