महत्वाच्या बातम्या

 विठू माऊली तू माऊली जगाची आषाढी एकादशीला जिल्हाभर दुमदुमली मंदिरे


- दर्शनासाठी भाविकांची रीघ, विठ्ठलनामाच्या अखंड गजरात भक्तिरसात रंगला गडचिरोली जिल्हा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त शनिवारी संपूर्ण गडचिरोली जिल्हा विठ्ठलभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाला. विठू माऊली तू माऊली जगाची विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल ज्ञानोबा-तुकाराम अशा अखंड जयघोषाने जिल्ह्यातील विठ्ठल मंदिरे दुमदुमून गेली. पहाटेपासूनच मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. टाळ-मृदंगाच्या गजरात, हरिनाम सप्ताह, भजन-कीर्तन आणि सामूहिक नामस्मरणामुळे सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

आषाढी एकादशी हा वारकरी संप्रदायासाठी अत्यंत महत्त्वाचा उत्सव मानला जातो. या निमित्ताने गडचिरोली शहरासह ग्रामीण भागातील विठ्ठल मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. पहाटे काकड आरती, महापूजा, अभिषेक, हरिपाठ, भजन, कीर्तन आणि महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला. विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक आणि बालगोपाळांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

शहरातील गुजरी येथील विठ्ठल मंदिरात सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची लांबच लांब रांग लागली होती. मंदिर परिसर विठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमून गेला होता. सेमाना येथील विठ्ठल मंदिरातही दिवसभर भाविकांची रेलचेल पाहायला मिळाली. मंदिर परिसरात भजन, हरिपाठ आणि कीर्तनाच्या कार्यक्रमांना भक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

याशिवाय आरमोरी, सिरोंचा, चामोर्शी, देसाईगंज, वैरागड आणि कढोली येथेही आषाढी एकादशीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. अनेक ठिकाणी दिंड्या, सामूहिक हरिनाम संकीर्तन, भजन-कीर्तन आणि विठ्ठल-रुक्मिणीची विशेष पूजा करण्यात आली. ज्ञानोबा-तुकाराम आणि विठ्ठल विठ्ठलच्या अखंड जयघोषात टाळ-मृदंगाच्या तालावर तल्लीन झालेल्या वारकरी आणि भाविकांमुळे संपूर्ण परिसर विठ्ठलमय झाला होता.

विठोबाचे पाय पाहता डोळे झाले तृप्त, जन्माचे सार्थक झाले त्रिभुवनी डोळा पाहिली पंढरी, सुख झाले या संसारी  अशा अभंगांच्या स्वरांनी मंदिर परिसर भारावून गेला. भक्तांच्या मुखी विठ्ठलनाम, हातात टाळ-मृदंग आणि अंतःकरणात अखंड भक्तिभाव असे वातावरण दिवसभर अनुभवायला मिळाले.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने जिल्ह्यातील मंदिरांमध्ये शिस्तबद्ध दर्शन व्यवस्था करण्यात आली होती. स्वयंसेवकांनी भाविकांना सहकार्य केले. दिवसभर चाललेल्या धार्मिक कार्यक्रमांमुळे गडचिरोली जिल्हाभर भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्माचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. विठ्ठलनामाच्या अखंड गजरात भाविकांनी माऊलीच्या चरणी नतमस्तक होत सुख, समृद्धी आणि सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली.





  Print






News - Gadchiroli




Related Photos