महत्वाच्या बातम्या

 पावसाळ्यात सर्पदंशापासून सावधान! घाबरू नका, तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचार घ्या


- जिल्ह्यात सर्पदंश प्रतिबंधक लशींचा पुरेसा साठा; अंधश्रद्धेला बळी न पडण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : पावसाळ्याच्या दिवसांत शेतीची कामे वाढणे, तसेच सापांच्या बिळांमध्ये पाणी शिरल्याने त्यांचा मानवी वस्ती आणि शेत परिसरातील वावर वाढत असतो. जंगलव्याप्त आणि दुर्गम भौगोलिक परिस्थिती असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात सर्पदंशाच्या घटना दरवर्षी घडत असल्याने नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. सर्पदंश झाल्यास कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा, भोंदू बाबा किंवा मांत्रिकांच्या नादी न लागता तात्काळ जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचार घ्यावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने केले आहे.

जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात सर्पदंश प्रतिबंधक लस (Anti-Snake Venom - ASV) मुबलक प्रमाणात उपलब्ध असून, दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील आरोग्य यंत्रणाही कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सज्ज असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

सर्पदंशाच्या घटनांमध्ये सातत्य -
जिल्हा आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, गडचिरोली जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत सर्पदंशाच्या घटनांमध्ये चढ-उतार दिसून आला आहे. सन २०२३ मध्ये ५४२, सन २०२४ मध्ये ४७९, तर सन २०२५ मध्ये ५८० सर्पदंशाच्या घटना नोंदविण्यात आल्या. चालू वर्षात जानेवारी ते जून २०२६ या सहा महिन्यांतच १३४ सर्पदंशाच्या घटनांची नोंद झाली आहे.

सध्या जिल्ह्यातील एक जिल्हा रुग्णालय, तीन उपजिल्हा रुग्णालये, १२ ग्रामीण रुग्णालये आणि सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मिळून ६,१८२ सर्पदंश प्रतिबंधक लशींचा (ASV) साठा उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी वेळ न दवडता शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपचाराचा लाभ घ्यावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

गोल्डन अवर महत्त्वाचा -
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी सांगितले की, सर्पदंश झाल्यानंतर पहिल्या एका तासातील गोल्डन अवर अत्यंत महत्त्वाचा असतो. या काळात रुग्णाला योग्य वैद्यकीय उपचार मिळाल्यास जीव वाचविण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला बळी न पडता रुग्णाला तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करावे. वेळेत उपचार हाच एकमेव प्रभावी उपाय आहे.

प्रत्येक साप विषारी नसतो -
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांनी सांगितले की, सर्पदंश झालेला प्रत्येक साप विषारी असतोच असे नाही. त्यामुळे घाबरून जाण्याऐवजी रुग्णाला धीर देणे आणि त्वरित उपचारासाठी रुग्णालयात नेणे आवश्यक आहे. जिल्हा रुग्णालय तसेच उपजिल्हा रुग्णालयांमध्ये तज्ज्ञ डॉक्टर, जीवनरक्षक सुविधा आणि आवश्यक औषधसाठा उपलब्ध आहे. चुकीचे घरगुती उपचार किंवा अंधश्रद्धेमुळे वेळ वाया घालवू नये.

ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सतर्क -
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी सांगितले की, जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ग्रामीण रुग्णालयांतील वैद्यकीय अधिकाऱ्यांना सर्पदंशाच्या रुग्णांवर तातडीने आणि प्राधान्याने उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शेतकरी आणि शेतमजुरांनी शेतात काम करताना गमबूट, हातमोजे वापरावेत आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे त्यांनी आवाहन केले.

सर्पदंश टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी -
आरोग्य विभागाने नागरिकांना काही महत्त्वाच्या प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
- रात्री किंवा अंधारात बाहेर पडताना टॉर्चचा वापर करावा.
- शेतात काम करताना गमबूट आणि हातमोजे वापरावेत.
- घराच्या परिसरात कचरा, लाकडांचे ढीग, दगड किंवा विटा साचू देऊ नयेत.
- घराभोवती असलेली बिळे बुजवावीत.
- शक्यतो खाटेवर झोपावे किंवा मच्छरदाणीचा वापर करावा.

सर्पदंश झाल्यास काय करावे -
सर्पदंश झाल्यास सर्वप्रथम रुग्णाला शांत ठेवावे आणि घाबरू देऊ नये. दंश झालेला हात किंवा पाय शक्य तितका स्थिर ठेवावा. अंगठी, घड्याळ, पैंजण किंवा घट्ट कपडे तात्काळ काढून टाकावेत. कोणतेही घरगुती उपाय, जखमेवर चिरा देणे, विष शोषण्याचा प्रयत्न करणे किंवा मांत्रिकांकडे जाणे टाळावे. रुग्णाला तात्काळ जवळच्या शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे.

पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटनांचे प्रमाण वाढण्याची शक्यता लक्षात घेता, नागरिकांनी सतर्क राहून योग्य ती खबरदारी घ्यावी आणि आपत्कालीन परिस्थितीत त्वरित वैद्यकीय मदत घेऊन जीवितहानी टाळावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos