मानद वन्यजीव रक्षकांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह : नियुक्ती रद्द करून नव्याने पारदर्शक प्रक्रिया राबविण्याची मागणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : राज्यातील मानद वन्यजीव रक्षकांच्या नियुक्ती प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असून सद्याची नियुक्ती बेकायदेशीरपणे करण्यात आल्याचा गंभीर आरोप इअर्स संस्थेचे सौरभ डोंगरे यांनी केला. चंद्रपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यभरातील या नियुक्त्या रद्द करून नव्याने पारदर्शक पद्धतीने प्रक्रिया राबविण्याची मागणी केली.
डोंगरे यांनी सांगितले की, तत्कालीन मुख्य वनसंरक्षक रामगावकर यांनी नियुक्ती प्रक्रियेत संपूर्ण पारदर्शकता ठेवण्याचे आणि आवश्यक कागदपत्रांची तपासणी करण्यास कोणतीही अडचण येणार नसल्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात विभागीय अधिकाऱ्यांकडून मुख्य वनसंरक्षकांच्या परवानगीशिवाय कोणतीही माहिती किंवा मागणी मान्य करता येणार नसल्याचे सांगण्यात आले.
त्यांनी आरोप केला की, सुरुवातीच्या यादीत काही अर्जदारांची नावे होती. मात्र, प्रधान मुख्य वनसंरक्षक (PCCF) बदलल्यानंतर नव्याने यादी मागवून त्यामधून काही नावे वगळण्यात आली आणि काही मर्जीतील व्यक्तींची नावे समाविष्ट करण्यात आली. यावेळी तब्बल ६५ दिवसांच्या अंतराने दोन याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. जर नियुक्तीसाठी मंत्र्यांची शिफारस आवश्यक होती, तर अर्ज मागविण्याची प्रक्रिया का राबविण्यात आली, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या, मानव-वन्यजीव संघर्ष आणि वनक्षेत्र इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक असतानाही येथे केवळ दोन मानद वन्यजीव रक्षकांची नियुक्ती करण्यात आली, तर इतर जिल्ह्यांत चार-चार नियुक्त्या करण्यात आल्याचे डोंगरे यांनी नमूद केले.मानद वन्यजीव रक्षक हे कायमस्वरूपी नोकरीचे पद नसतानाही अनेकांनी गैरसमजुतीतून अर्ज केले. त्यानंतर ही नोकरी नसल्याचे सांगत अनेक अर्जदारांना डावलण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.
वन्यजीव संरक्षणासाठी कार्यरत नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थांना त्यांच्या कार्यक्षेत्रानुसार जंगलात काम करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. काही मोजक्याच व्यक्तींना वन्यजीव कारवाईदरम्यान सहभागी करून घेतले जाते, ही पद्धत बदलण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नुकत्याच घडलेल्या वाघाच्या संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणात मानद वन्यजीव रक्षकांनी कोणती भूमिका घेतली, संबंधितांकडे जाब विचारला का, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तसेच वाढत्या मानव-वन्यजीव संघर्ष, हत्तींच्या हालचाली यांसारख्या गंभीर विषयांवर अद्याप कोणतीही प्रभावी बैठक किंवा ठोस कृती झालेली नसल्याची टीकाही डोंगरे यांनी केली. या पत्रकार परिषदेला दिनेश खाटे, मनीष नाईक, साईनाथ चौधरी, रोहित बेलसरे, राहुल चिलगिलवार आणि उदय पटेल उपस्थित होते.
News - Chandrapur




Petrol Price




