महत्वाच्या बातम्या

 २७ वा कारगिल विजय दिवस रविवारी उत्साहात साजरा होणार


- २२ वर्षांच्या अथक पाठपुराव्यानंतर उभारलेल्या गडचिरोलीच्या कारगिल स्मारकात शहीदांना मानवंदना; वीर कुटुंबीय व माजी सैनिकांचा होणार गौरव

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : कारगिल युद्धात मातृभूमीच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शहीद वीर जवानांच्या शौर्य, पराक्रम आणि त्यागाला अभिवादन करण्यासाठी २७ वा कारगिल विजय दिवस रविवार, २६ जुलै रोजी गडचिरोली येथे विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. कारगिल चौक दुर्गा उत्सव मंडळ, कारगिल स्मारक समिती आणि शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना, महाराष्ट्र राज्य, जिल्हा शाखा गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

गडचिरोली शहरातील कारगिल स्मारक हे आज जिल्ह्याच्या देशभक्तीचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. या स्मारकाच्या उभारणीमागे कारगिल स्मारक समितीचे संस्थापक उदय धकाते यांचा तब्बल २२ वर्षांचा सातत्यपूर्ण संघर्ष आहे. सन २००० पासून त्यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा, पायपीट आणि अथक प्रयत्न सुरू ठेवले. त्यांच्या या दीर्घ लढ्याला अखेर यश मिळाले आणि २०२२ मध्ये गडचिरोली शहरात शहीद वीर जवानांच्या स्मृती जपणारे कारगिल स्मारक साकार झाले.

विशेष म्हणजे, स्मारक उभारण्यापूर्वीपासूनच कारगिल चौकात मागील २६ वर्षांपासून कारगिल विजय दिनानिमित्त शहीदांना मानवंदना अर्पण करण्याची परंपरा अखंडपणे सुरू आहे. त्यामुळे यंदाचा कारगिल विजय दिवस या स्मारकाच्या साक्षीने अधिक भावपूर्ण वातावरणात साजरा होणार आहे.

कारगिल विजय रॅलीने कार्यक्रमाची सुरुवात -
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८ वाजता इंदिरा (गांधी) चौकातून माजी सैनिकांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या कारगिल विजय रॅलीने होईल. शहरातील प्रमुख मार्गाने ही रॅली कारगिल चौकातील शहीद स्मारकापर्यंत पोहोचेल. त्यानंतर शहीद जवानांच्या स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात येईल. यावेळी वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी, गुणवंत पाल्य तसेच विविध पुरस्कारांनी सन्मानित माजी सैनिकांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे.

मान्यवरांची उपस्थिती -
कार्यक्रमाला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक एम. रमेश (भा.पो.से.) प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. याशिवाय आमदार डॉ. मिलिंद नरोटे, माजी खासदार डॉ. अशोक नेते, लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे निवासी संचालक हिम्मतसिंह बेडला, लेफ्टनंट कर्नल रामनाथ स्वामी, कृष्णा रेड्डी, रतिकांता साहू, नगराध्यक्ष प्रणोती सागर निंबोरकर, होमराज डोनाळकर तसेच कारगिल स्मारक समितीचे संस्थापक उदय धकाते यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

कार्यक्रमाचे वेळापत्रक -
- सकाळी ८.०० वाजता : कारगिल विजय रॅली (इंदिरा/गांधी चौक ते कारगिल चौक)
- सकाळी ९.०० वाजता : मान्यवरांचे आगमन
- सकाळी ९.०५ वाजता : शहीद स्मारकास पुष्पचक्र अर्पण व मानवंदना
- सकाळी ९.१० वाजता : वीर कुटुंबीय व माजी सैनिकांचा सत्कार
- सकाळी ९.४० वाजता : मान्यवरांचे मार्गदर्शन
- सकाळी १०.३० वाजता : वंदे मातरम् व कार्यक्रमाची सांगता

नागरिकांना सहभागाचे आवाहन -
कारगिल विजय दिन हा केवळ विजयाचा उत्सव नसून देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीर जवानांच्या स्मृतींना अभिवादन करण्याचा दिवस असल्याने शहरातील सामाजिक, धार्मिक, राजकीय संघटनांचे पदाधिकारी, माजी सैनिक, युवक, महिला, विद्यार्थी तसेच देशभक्त नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शहीदांना आदरांजली अर्पण करावी, असे आवाहन कारगिल स्मारक समितीचे प्रकाश भांडेकर, कालू गोवर्धन, नंदू कुमरे, सुनील देशमुख, प्रकाश धकाते, डॉ. बिडकर, मोबीन सय्यद, सुचिता धकाते, निलीमा देशमुख, माजी सैनिक सुभेदार मेजर ऋषी वंजारी (से.नि.), ईश्वरजी राऊत (से.नि. सैनिक तथा नायब तहसीलदार), हवालदार डिसेज वालदे (नि.), हवालदार महादेव वासेकर (नि.), हवालदार विनायक गेडाम (नि.), हवालदार कैलास सिडाम (नि.) तसेच शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना, महाराष्ट्र राज्य, जिल्हा शाखा गडचिरोली आणि समस्त आजी-माजी सैनिकांच्या वतीने करण्यात आले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos