टस्कर हत्तीचा घराच्या अंगणात शिरकाव, वैरागड-आरमोरी मार्गावर बिबट्याचे दर्शन : सालमारा येथे धान रोपवाटिकांची नासधूस

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : वैरागड परिसरात वन्यप्राण्यांचा वाढता वावर नागरिकांसह शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. गुरुवारी पहाटे टस्कर हत्ती थेट एका घराच्या अंगणात शिरल्याची घटना घडली, तर काही वेळानंतर वैरागड-आरमोरी मार्गावर बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात खळबळ उडाली.
याचदरम्यान आरमोरी तालुक्यातील सालमारा शेतशिवारात रानटी हत्तींच्या कळपाने धान रोपवाटिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस केल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. या सलग घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाच्या कार्यपद्धतीबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे सुमारे २.५० वाजता वैरागड-धानोरा मार्गालगत जुन्या बाजार परिसरातील रवी कवडू आकरे यांच्या घराच्या अंगणात एक टस्कर हत्ती शिरला. अंगणात जनावरांसाठी ठेवलेले खाद्य त्याने फस्त केले आणि सुमारे अर्धा तास तो तेथेच वावरत होता. यावेळी आकरे कुटुंबीयांनी प्रसंगावधान राखत घराबाहेर न पडता शांतपणे परिस्थितीचा सामना केला. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही. त्यानंतर हत्ती जंगलाच्या दिशेने निघून गेला. या घटनेत घराचे कोणतेही नुकसान झाले नसले तरी कुटुंबीयांची चांगलीच तारांबळ उडाली.
यानंतर पहाटे सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास वैरागडपासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावरील वैरागड-आरमोरी मार्गावरील पाण्याच्या टाकीजवळ चारचाकी वाहनातून प्रवास करणाऱ्या नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांमध्ये तसेच परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, आरमोरी तालुक्यातील सालमारा शेतशिवारात रानटी हत्तींच्या कळपाने धान रोवणीसाठी तयार करण्यात आलेल्या पन्ह्यांची मोठ्या प्रमाणात नासधूस केली. काही ठिकाणी हत्ती चिखलात बसल्याने रोपे पूर्णपणे नष्ट झाली, तर अनेक ठिकाणी पायाखाली तुडविल्याने पन्हे उद्ध्वस्त झाले. धान रोवणीच्या सुरुवातीलाच झालेल्या या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
या घटनेत बकाराम नारनवरे, पुंडलिक वट्टी, निमला कुळसगे, अनिल वट्टी, काशीनाथ नारनवरे, लीलाधर काबळे, सचिन मानकर, विक्रम नारनवरे, चंद्रभान सहारे यांच्यासह १० ते १५ शेतकऱ्यांच्या धान रोपवाटिकांचे नुकसान झाले आहे. वैरागड परिसरात सातत्याने रानटी हत्तींचा वावर वाढत असून धान रोवणीची पन्हे तुडवल्याने शेतकरी प्रचंड त्रस्त झाले आहेत.
वन विभागाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, तसेच हत्ती व बिबट्याच्या वाढत्या वावरावर नियंत्रण आणण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते दिलीप घोडाम यांनी दिला आहे.
वन्यप्राण्यांचा वाढता वावर लक्षात घेता वन विभागाने गस्त वाढवून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्याबरोबरच मानवी वस्त्यांमध्ये वन्यप्राण्यांचा प्रवेश रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




