महत्वाच्या बातम्या

 सुरक्षा मंत्र पुस्तिकेचा विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांच्या हस्ते शुभारंभ


- विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी चंद्रपूर पोलीस दलाचा अभिनव उपक्रम; पालक व शिक्षकांनाही मिळणार प्रभावी मार्गदर्शन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : शालेय विद्यार्थ्यांना सामाजिक, कायदेशीर, सायबर तसेच मानसिक ताणतणावाशी संबंधित विविध धोक्यांविषयी जागरूक करून त्यांच्यामध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने चंद्रपूर पोलीस दलाने तयार केलेल्या सुरक्षा मंत्र या मार्गदर्शिका पुस्तिकेचा शुभारंभ विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र संदीप पाटील यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आला. पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या पुस्तिकेमुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना सुरक्षिततेसंदर्भातील विविध विषयांची एकाच ठिकाणी उपयुक्त माहिती उपलब्ध होणार आहे.

सध्याच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांसमोर सायबर गुन्हे, सोशल मीडियावरील फसवणूक, मानसिक तणाव, व्यसनाधीनता, लैंगिक अत्याचार तसेच रस्ते सुरक्षेसंबंधी अनेक आव्हाने उभी राहत आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती घडवून आणण्यासाठी आणि त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे या हेतूने आधुनिक जगात एक पाऊल पुढे या संकल्पनेवर आधारित सुरक्षा मंत्र पुस्तिकेची निर्मिती करण्यात आली आहे.

या मार्गदर्शिकेत चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श, पोक्सो (POCSO) कायद्याची माहिती, सायबर गुन्ह्यांपासून बचाव, ऑनलाईन छळ, फोटो मॉर्फिंग आणि आर्थिक फसवणूक टाळण्याचे उपाय, अमली पदार्थांचे दुष्परिणाम, मानसिक तणाव व परीक्षा व्यवस्थापन, तसेच वाहतूक नियम, हेल्मेट, सीटबेल्ट आणि रस्ता सुरक्षेचे महत्त्व यासारख्या विषयांचा सोप्या आणि समजण्यास सुलभ भाषेत समावेश करण्यात आला आहे.

पुस्तिकेची मुद्रित आवृत्तीबरोबरच डिजिटल ई-बुकही तयार करण्यात आले असून त्यासाठी विशेष QR कोड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना मोबाईलच्या माध्यमातूनही आवश्यक माहिती सहजपणे मिळणार आहे.

विद्यार्थ्यांना स्वतःच्या अधिकारांची जाणीव करून देणे, अनुचित प्रकारांना धैर्याने विरोध करण्याची मानसिकता तयार करणे, पालक व शिक्षकांना संवेदनशील विषयांवर मुलांशी प्रभावी संवाद साधण्यासाठी मार्गदर्शन करणे तसेच पोलीस व नागरिकांमधील विश्वास अधिक दृढ करणे, ही या पुस्तिकेमागील प्रमुख उद्दिष्टे असल्याचे पोलीस विभागाने स्पष्ट केले आहे.

याशिवाय आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत मिळावी यासाठी डायल ११२, दामिनी पथक, चाइल्डलाईन १०९८ आणि इतर महत्त्वाच्या हेल्पलाइन क्रमांकांचाही पुस्तिकेत समावेश करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण सुरक्षिततेसाठी चंद्रपूर पोलीस दलाने हाती घेतलेला हा उपक्रम भविष्यात शाळांमधील जनजागृतीसाठी प्रभावी ठरणार असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.





  Print






News - Chandrapur




Related Photos