महत्वाच्या बातम्या

 बाबूपेठमध्ये किरकोळ वादातून रक्तरंजित हल्ला : चाकूच्या वारात अल्पवयीनासह दोन भाऊ जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील बाबूपेठ परिसरात किरकोळ वादाचे पर्यवसान रक्तरंजित हल्ल्यात झाल्याची धक्कादायक घटना रविवारी १९ जुलै रात्री घडली. लहान भावासोबत झालेल्या शाब्दिक वादाचा राग मनात धरून दोन युवकांनी घराबाहेर उभ्या असलेल्या दोन भावांवर चाकूने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात अल्पवयीन मुलासह त्याचा मोठा भाऊ जखमी झाला असून, जखमी अल्पवयीन मुलावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, समता चौक, बाबूपेठ येथील यश मरिया मगरे वय १९ हा आंबेडकर महाविद्यालयात बी.कॉम. प्रथम वर्षात शिक्षण घेत असून तो कुटुंबासह राहतो. त्याचा लहान भाऊ आदित्य मगरे वय १६ याचा परिसरात राहणाऱ्या लक्की वासनिक याच्यासोबत शिवीगाळ झाल्याने दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता. रविवारी दुपारी लक्की वासनिकने यशला दूरध्वनी करून आदित्यला मारहाण करण्याची धमकी दिली होती. त्यावेळी यशने भावाच्या वतीने माफी मागून वाद मिटविण्याचा प्रयत्न केला तसेच घरी आल्यानंतर आदित्यलाही कोणाशीही वाद घालू नये, अशी समज दिली होती.

मात्र, रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास यश व त्याचा भाऊ आदित्य हे घराजवळील विशाल यांच्या पानटपरीजवळ उभे असताना लक्की वासनिक व त्याचा मित्र वैभव दुचाकीवर तेथे आले. सकाळच्या वादाचा राग मनात धरून लक्की वासनिकने हातातील चाकूने आदित्यवर सपासप वार केले. या हल्ल्यात आदित्यच्या डोक्यावर व उजव्या हाताच्या मनगटावर गंभीर जखमा झाल्या. दरम्यान, भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या यशवरही लक्की वासनिकने चाकूने हल्ला करून त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्याजवळ व मनगटाजवळ जखमी केले.

यावेळी आरोपी वैभव यानेही दोन्ही भावांना हाताबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. हल्ल्यानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून दुचाकीसह पसार झाले.

घटनेनंतर जखमी आदित्यला नातेवाईकांच्या मदतीने तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या डोक्यातून व हातातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असल्याने डॉक्टरांनी तातडीने उपचार करून त्याला रुग्णालयात दाखल केले. यशवरही प्राथमिक उपचार करण्यात आले.

या प्रकरणी यश मरिया मगरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात आरोपी लक्की वासनिक व त्याचा साथीदार वैभव यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास चंद्रपूर शहर पोलीस करीत आहेत.





  Print






News - Chandrapur




Related Photos