बल्लारपूरात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी एकदिवसीय धरणे आंदोलन : २० जुलै रोजी आंबेडकर चौकात होणार आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : शहरातील युवक, विद्यार्थी तसेच विविध सामाजिक, शैक्षणिक व राजकीय संघटनांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी सोमवार, २० जुलै २०२६ रोजी एकदिवसीय धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
दिल्लीतील जंतर-मंतर येथे उपोषणास बसलेल्या विद्यार्थ्यांच्या तसेच सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या मागण्यांना जाहीर व शांततापूर्ण पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
आयोजकांच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, देशासाठी एक पाऊल, सक्षम भारत या घोषवाक्याखाली सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा परिसर, बल्लारपूर येथे धरणे आंदोलन होणार आहे. विद्यार्थ्यांचे प्रश्न, शैक्षणिक धोरणे आणि युवकांच्या भवितव्याशी संबंधित विविध मुद्द्यांवर शासनाचे लक्ष वेधण्याचा या आंदोलनाचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे.
या आंदोलनाला शहरातील विविध युवक संघटना, शैक्षणिक संस्था, सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, डॉक्टर व केमिस्ट असोसिएशन, शेतकरी संघटना, व्यापारी संघटना तसेच विविध स्वयंसेवी संस्थांनी जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. बल्लारपूरातील अनेक कोचिंग क्लासेस व शैक्षणिक संस्थांनीही या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
आयोजकांनी शहरातील युवक, विद्यार्थी, पालक, सुशिक्षित बेरोजगार तसेच विविध क्षेत्रातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शांततापूर्ण आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी व देशाच्या भवितव्यासाठी एकत्र येऊन लोकशाही मार्गाने आवाज बुलंद करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
News - Chandrapur




Petrol Price




