महत्वाच्या बातम्या

 अल्पवयीन मुलगी घरातून बेपत्ता : अज्ञात व्यक्तीने फूस लावून नेल्याचा संशय


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : शहरातील टेकडी परिसरातून १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी घरातून बेपत्ता झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. याप्रकरणी आजीच्या तक्रारीवरून बल्लारपूर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंद करून मुलीचा शोध सुरू केला आहे.

प्राप्त माहितीनुसार, संबंधित अल्पवयीन मुलगी मानसिक उपचार घेत असून यापूर्वीही सन २०२३ मध्ये घरातून निघून गेली होती. त्यावेळी ती परत घरी आली होती.९  जुलै रोजी दुपारी सुमारे १ वाजता ती मैत्रिणीच्या घरी जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडली. मात्र, रात्रीपर्यंत ती घरी परतली नाही. दुसऱ्या दिवशी, १० जुलै रोजी दुपारी ती काही वेळासाठी घरी आली. 

यावेळी घरच्यांनी मागील दिवशी घरी न परतल्याबाबत विचारणा केली असता, तिने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

यानंतर दुपारी सुमारे ४ वाजता तिने स्वतःचे कपडे व अन्य साहित्य बॅगेत भरून कोणालाही काही न सांगता घर सोडले. त्यानंतर ती परत घरी आली नाही. तिच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता मोबाईल बंद असल्याचे आढळून आले. नातेवाईक व परिचितांकडे शोध घेऊनही तिचा कोणताही मागमूस लागला नाही.

तक्रारीत अज्ञात व्यक्तीने अल्पवयीन मुलीला फूस लावून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा नोंद करून तिचा शोध सुरू केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मदन दिवटे करीत आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos