महत्वाच्या बातम्या

 कृषी पायाभूत सुविधा निधीतून शेतकऱ्यांना मोठी संधी


- दोन कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जावर ३ टक्के व्याज सवलत; गडचिरोलीत विशेष मोहीम सुरू

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : शेतमालाचे मूल्यवर्धन, सुरक्षित साठवणूक, कृषी प्रक्रिया उद्योगांना चालना आणि आधुनिक विपणन व्यवस्था सक्षम करण्यासाठी केंद्र शासनाच्या कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेअंतर्गत आकर्षक आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील पात्र शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या (एफपीओ), सहकारी संस्था तसेच कृषी उद्योजकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, यासाठी तातडीने ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा आत्माचे प्रकल्प संचालक प्रीती हिरळकर यांनी केले आहे.

कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेल्या या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गडचिरोली जिल्ह्यात १९ जून ते २० जुलै या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेद्वारे शेतकऱ्यांना पीक काढणीनंतर आवश्यक असलेल्या साठवणूक, प्रक्रिया आणि बाजारपेठ व्यवस्थापनाशी संबंधित सुविधा उभारण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.

या योजनेमुळे कृषी उत्पादनांची गुणवत्ता टिकवून ठेवणे, साठवण क्षमता वाढविणे, प्रक्रिया उद्योगांना चालना देणे तसेच शेतमालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्यास मदत होणार आहे. विशेषतः सामुदायिक शेती आणि कृषी आधारित उद्योगांसाठी आधुनिक सुविधा निर्माण करण्यास या निधीचा मोठा उपयोग होणार आहे.

योजनेअंतर्गत मंजूर होणाऱ्या दोन कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जावर ३ टक्के व्याज सवलत देण्यात येते. तसेच या कर्जासाठी क्रेडिट गॅरंटी (पतहमी) सुविधा उपलब्ध असल्याने लाभार्थ्यांवरील आर्थिक भार कमी होण्यास मदत होते. त्यामुळे शेतकरी आणि कृषी उद्योजकांना नवीन प्रकल्प उभारण्यासाठी आर्थिक पाठबळ मिळत आहे.

या योजनेंतर्गत विविध कृषी पायाभूत प्रकल्पांना आर्थिक सहाय्य दिले जाते. यामध्ये गोदामे, शीतगृहे (कोल्ड स्टोरेज), पॅक हाऊस, ग्रेडिंग व सॉर्टिंग युनिट, प्राथमिक प्रक्रिया केंद्रे, कृषी लॉजिस्टिक्स सुविधा, सायलो, रिपकनिंग चेंबर, ई-मार्केट सुविधा, जैविक इनपुट उत्पादन युनिट तसेच कस्टम हायरिंग सेंटर (सीएचसी) यांचा समावेश आहे.

विशेष मोहिमेच्या कालावधीत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये शेतकरी मेळावे, कार्यशाळा, बँक समन्वय बैठका तसेच लाभार्थी मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात येत आहेत. या माध्यमातून इच्छुक लाभार्थ्यांना योजनेची माहिती, अर्ज प्रक्रिया आणि उपलब्ध आर्थिक सुविधांबाबत मार्गदर्शन केले जात आहे.

गडचिरोली जिल्ह्यात भात, नाचणी, तूर, हळद, काशीफळ, हरभरा, मका, भाजीपाला तसेच इतर नाशवंत कृषी उत्पादनांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. त्यामुळे शीतसाखळी, पॅक हाऊस आणि आधुनिक कृषी प्रक्रिया सुविधांची उभारणी करण्यासाठी ही योजना अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

या सुविधांच्या माध्यमातून शेतमालाची नासाडी कमी होऊन त्याचे मूल्यवर्धन होईल, शेतकऱ्यांना अधिक चांगला बाजारभाव मिळण्यास मदत होईल आणि कृषी क्षेत्रातील रोजगार व उद्योगाच्या संधींना चालना मिळेल. त्यामुळे जिल्ह्यातील पात्र शेतकरी, एफपीओ, सहकारी संस्था आणि कृषी उद्योजकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos