स्मार्ट मीटर हटवा – जुने मीटर बसवा : वाढीव वीज बिलांविरोधात चामोर्शीत महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा


- युवक काँग्रेस व एनएसयूआयचे तीव्र आंदोलन; वाढीव वीज बिले कमी करण्याची मागणी, लेखी आश्वासनानंतर आंदोलनाची तात्पुरती सांगता
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / चामोर्शी : स्मार्ट वीज मीटरमुळे सर्वसामान्य वीज ग्राहकांना अवाजवी आणि वाढीव वीज बिले आकारली जात असल्याचा आरोप करत युवक काँग्रेस व एनएसयूआय (NSUI) गडचिरोलीच्या वतीने चामोर्शी येथे महावितरण कार्यालयावर भव्य धडक मोर्चा काढण्यात आला. लक्ष्मी गेट येथून सुरू झालेल्या या मोर्चात युवक, शेतकरी, शेतमजूर, महिला आणि विविध गावांतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. स्मार्ट मीटर हटवा – जुने मीटर बसवा, वाढीव वीज बिले रद्द करा, सर्वसामान्यांना न्याय द्या अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.
स्मार्ट मीटर योजना तात्काळ रद्द करून पूर्वीप्रमाणे जुने वीज मीटर बसविणे, वाढीव व अवाजवी वीज बिले कमी करणे आणि वीज ग्राहकांना दिलासा देणे या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. आंदोलनकर्त्यांनी महावितरण कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करत शासनाच्या धोरणाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.
या आंदोलनाला महेंद्रभाऊ ब्राम्हणवाडे यांनी जाहीर पाठिंबा देत सहभाग घेतला. यावेळी त्यांनी महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्यांना नागरिकांच्या समस्यांबाबत जाब विचारत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. स्मार्ट मीटर बसविल्यानंतर शेतकरी, शेतमजूर, गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना अपेक्षेपेक्षा अनेकपटीने वाढीव वीज बिले येत असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, महागाई, शेतीचा वाढता उत्पादन खर्च आणि आर्थिक संकटामुळे नागरिक आधीच अडचणीत आहेत. अशा परिस्थितीत स्मार्ट मीटरच्या माध्यमातून वाढीव वीज बिलांचा अतिरिक्त भार टाकणे हे सर्वसामान्यांवरील अन्याय असून शासनाने याची गंभीर दखल घेण्याची गरज आहे. स्मार्ट मीटर योजना तात्काळ रद्द करून पूर्वीप्रमाणे जुने मीटर बसवावेत, वाढीव वीज बिले कमी करावीत आणि भविष्यात कोणत्याही ग्राहकावर अन्याय होणार नाही, याची हमी शासनाने द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्यास युवक काँग्रेस, एनएसयूआय आणि जनतेच्या सहभागातून आणखी व्यापक आणि तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
यानंतर आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. निवेदन स्वीकारल्यानंतर उपकार्यकारी अभियंत्यांनी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या शासनाकडे पाठवून त्यावर आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत लेखी आश्वासन दिले. या लेखी आश्वासनानंतर आंदोलनाची तात्पुरती सांगता करण्यात आली. मात्र, शासनाने मागण्यांवर सकारात्मक निर्णय न घेतल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला.
या धडक मोर्चात युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. विश्वजीत कोवासे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, पर्यावरण सेलचे अध्यक्ष राजेश ठाकूर, चामोर्शी तालुकाध्यक्ष प्रमोद भगत, गडचिरोली तालुकाध्यक्ष वसंत राऊत, जिल्हा उपाध्यक्ष निकेश गद्देवार, नगर उपाध्यक्ष लोमेश बुरांडे, विजय लाड, राहुल वैरागडे, विलास चिचघरे, पीपलदास सोयाम, नितेश राठोड, प्रेमानंद गोंगले, हरबाजी मोरे, तेजस कोंडेकर, अमर मोगरे, आशिष घेर, ओमप्रकाश चौधरी, हेमंत कोवासे, सुभाष कोठारे, जावेद खान, संजय बुरांडे, आचाल चलकलवार, नेहा आभारे यांच्यासह युवक काँग्रेस, एनएसयूआय, काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते, शेतकरी, शेतमजूर, महिला आणि विविध गावांतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
आंदोलनादरम्यान महावितरण कार्यालय परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. मात्र, प्रशासनाने निवेदन स्वीकारून लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन शांततेत स्थगित करण्यात आले. आता शासन या मागण्यांवर कोणती भूमिका घेते, याकडे चामोर्शी तालुक्यासह जिल्ह्यातील वीज ग्राहकांचे लक्ष लागले आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




