महत्वाच्या बातम्या

 चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेस गटनेतापदाच्या वादात नवे वळण : उच्च न्यायालयाकडून विभागीय आयुक्तांच्या आदेशाला स्थगिती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आघाडीच्या गटनेतापदावरून सुरू असलेल्या राजकीय व प्रशासकीय वादात महत्त्वपूर्ण घडामोड घडली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विभागीय आयुक्त, नागपूर यांनी १७ जून २०२६ रोजी दिलेल्या आदेशाच्या प्रभाव, कार्यवाही व अंमलबजावणीला अंतरिम स्थगिती देत याप्रकरणी नोटीस जारी केली आहे.

विभागीय आयुक्तांनी १७ जून रोजी दिलेल्या आदेशाद्वारे राजेश मुरली अड्डूर यांची काँग्रेस आघाडीच्या गटनेता म्हणून असलेली नोंद रद्द करून सुरेंद्र अडबाले यांची गटनेता म्हणून नोंद घेण्याचे निर्देश दिले होते. या निर्णयाला आव्हान देत राजेश अड्डूर व अन्य यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका क्रमांक ४८१८/२०२६ दाखल केली.

सोमवारी न्यायमूर्ती अनिल एस. किलोर आणि न्यायमूर्ती राज डी. वाकोडे यांच्या खंडपीठासमोर याचिकेची सुनावणी झाली. याचिकेतील मुद्द्यांचा प्राथमिक विचार केल्यानंतर न्यायालयाने संबंधित प्रतिवाद्यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले असून प्रकरणाची पुढील सुनावणी ६ जुलै २०२६ रोजी ठेवण्यात आली आहे.

न्यायालयाने आपल्या अंतरिम आदेशात स्पष्टपणे नमूद केले आहे की, विभागीय आयुक्तांनी १७ जून रोजी दिलेल्या आदेशाच्या प्रभाव, कार्यवाही आणि अंमलबजावणीवर पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती राहील. त्यामुळे संबंधित आदेशाची अंमलबजावणी तात्पुरती थांबली असून गटनेतापदाच्या वादावर अंतिम निर्णय न्यायालयीन प्रक्रियेनंतरच होणार आहे.

दरम्यान, राजेश अड्डूर यांच्या वतीने विभागीय आयुक्त तसेच चंद्रपूर महानगरपालिका प्रशासनाला पाठविण्यात आलेल्या पत्रात उच्च न्यायालयाच्या स्थगिती आदेशाची माहिती देण्यात आली आहे. तसेच न्यायालयाचा अंतिम निर्णय होईपर्यंत काँग्रेस आघाडीच्या वतीने इतर कोणत्याही व्यक्तीकडून येणाऱ्या पत्रव्यवहाराची किंवा प्रतिनिधित्वाची दखल घेऊ नये, अशी विनंती प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेस आघाडीच्या नेतृत्वावरून सुरू असलेल्या या वादाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, ६ जुलै रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीत न्यायालय कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos