महत्वाच्या बातम्या

 एकल महिला धोरणाबाबत सर्वांनी संवेदनशीलपणे अभिप्राय नोंदवावेत : निवासी उपजिल्हाधिकारी कुंभार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : राज्यातील एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रभावी व सर्वसमावेशक धोरण तयार करण्याच्या उद्देशाने महिला व बालविकास विभागामार्फत एकल महिला धोरणाच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय बैठक नियोजन भवन, चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आली. यावेळी उपस्थित नागरिक, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक, संशोधक व विषयतज्ज्ञांनी अत्यंत संवेदनशीलपणे आपले अभिप्राय नोंदवावेत, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी दगडु कुंभार यांनी केले.

पुढे ते म्हणाले, समाजात अनेकदा एकल महिलांना अपेक्षित सन्मान व आधार मिळत नाही. त्यांच्या समस्या, अडचणी आणि भावनिक संघर्ष समजून घेऊन शासनाने तयार करावयाच्या धोरणामध्ये त्यांचे हित जपले जावे. त्यासाठी सर्व घटकांनी सकारात्मक व संवेदनशील दृष्टिकोनातून अभिप्राय नोंदविणे आवश्यक आहे.

महिला व बालविकास आयुक्तालय, पुणे यांच्या निर्देशान्वये तथा जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या बैठकीत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक मंजिरी टकले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नुतन सावंत, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या एड दक्षिणा जुनगरे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मिनाक्षी भस्मे, सहाय्यक बालविकास प्रकल्प अधिकारी प्रकाश भांदककर, सहाय्यक बालविकास प्रकल्प अधिकारी दामोधर कुमरे, जिल्हा समन्वयक माविम प्रदीप काठोळे आदींनी मार्गदर्शन केले.

प्रास्ताविकात जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मिनाक्षी भस्मे यांनी एकल महिला धोरणाची उद्दिष्टे व अपेक्षित अभिप्राय याविषयी सविस्तर माहिती दिली. बैठकीत उपस्थित एकल महिला व विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी पुनर्विवाह, रोजगार, कौशल्य विकास, मुलांचे शिक्षण, सामाजिक सुरक्षा व सक्षमीकरण यासंदर्भातील सूचना मांडल्या. त्यावर मान्यवरांनी समाधानकारक उत्तरे देत शासनाच्या प्रस्तावित धोरणामध्ये या बाबींचा सकारात्मक विचार करण्यात येणार असल्याचे सांगितले.

बैठकीची सुरुवात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करून झाली. कार्यक्रमाचे संचालन कल्पना राजुरकर यांनी तर आभार जिल्हा परिविक्षा अधिकारी मोरेश्वर झोडे यांनी मानले. या बैठकीस विविध क्षेत्रातील मान्यवर, अधिकारी, कर्मचारी तसेच एकल महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.





  Print






News - Chandrapur




Related Photos