महत्वाच्या बातम्या

 विधवा सुनेचा विनयभंग : सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : नातेसंबंधांना काळिमा फासणारी धक्कादायक घटना सावली तालुक्यात उघडकीस आली आहे. पतीच्या निधनानंतर दोन लहान मुलांसह सासरी राहत असलेल्या एका ३० वर्षीय विधवा महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी तिच्या सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, पीडित महिलेच्या पतीचे फेब्रुवारी २०२६ मध्ये निधन झाले होते. त्यानंतर ती आपल्या दोन मुलांसह सासू-सासरे व इतर कुटुंबीयांसोबत राहत होती.९ जून रोजी रात्री सर्व कुटुंबीयांनी एकत्र जेवण करून आपापल्या ठिकाणी विश्रांती घेतली. पीडित महिला आपल्या मुलीसोबत घरातील एका खोलीत झोपली होती.

रात्री उशिरा झोपेत असताना तिच्या अंगाला स्पर्श झाल्याने ती अचानक जागी झाली. त्यावेळी खोलीतील लाईट बंद असल्याचे तिच्या लक्षात आले. महिलेने तत्काळ मोबाईलचा टॉर्च सुरू करून खोलीतील लाईट लावल्यानंतर तिचे सासरे खोलीत असल्याचे दिसून आले. लाईट लागल्याने तिची मुलगीही जागी झाली. त्यानंतर संबंधित व्यक्तीने खोलीबाहेर जात दरवाजा बाहेरून बंद केला.

पीडितेने आरडाओरडा केल्यानंतर दरवाजा उघडण्यात आला. घटनेमुळे मानसिक धक्का बसल्याने आणि भीतीच्या वातावरणामुळे तिने तत्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली नाही. दुसऱ्या दिवशी नातेवाईकांशी चर्चा करून तिने सावली पोलीस ठाणे गाठत घडलेला प्रकार कथन केला.

महिलेच्या तक्रारीवरून सावली पोलिसांनी आरोपी सासऱ्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ७५(१)(i) अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सावली पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रदीप पुल्लरवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार कपिल भंडारकर करीत आहेत.

घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त करण्यात येत असून, नातेसंबंधांवरील विश्वासाला तडा देणाऱ्या अशा प्रकारांविरोधात कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos