महत्वाच्या बातम्या

 घोटनिंबाळा परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट जेरबंद


- महिनाभरात २० हून अधिक कालवडी व वासरांवर हल्ले; ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा निश्वास

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : मागील महिनाभरापासून भद्रावती तालुक्यातील घोटनिंबाळा व परिसरातील गावांमध्ये दहशत माजविणाऱ्या बिबट्याला अखेर वन विभागाने जेरबंद करण्यात यश मिळविले आहे. सततच्या हल्ल्यांमुळे शेतकरी व पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. बिबट्याने जवळपास २० कालवडी व लहान वासरांवर हल्ले करून त्यांचा फडशा पाडल्याने नागरिकांमध्ये प्रचंड चिंतेचे वातावरण होते.

घोटनिंबाळा, पारखी लोणारा, चालबर्डी, कचराला, रामटेके सोसायटी तसेच देऊळवाडा परिसरात बिबट्याचा मुक्त वावर सुरू असल्याने ग्रामस्थांमध्ये दहशत निर्माण झाली होती. अनेक शेतकरी रात्रीच्या वेळी शेतात जाणे टाळत होते, तर पशुपालकांना जनावरांच्या सुरक्षेची चिंता सतावत होती.

नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत वन विभागाने घोटनिंबाळा येथील शेतकरी शंकर रामटेके यांच्या शेतात पाच ते सहा दिवसांपूर्वी पिंजरा लावला होता. अखेर मंगळवारी पहाटे सुमारे चार वाजताच्या सुमारास हा बिबट पिंजऱ्यात अडकला. पकडण्यात आलेला बिबट अंदाजे साडेचार वर्षांचा नर असल्याची माहिती वन विभागाने दिली.

बिबट जेरबंद झाल्यानंतर परिसरातील ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. मात्र या भागात आणखी बिबटे असल्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली असून वन विभागाने गस्त वाढवून आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.

सदर कारवाईत वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे, क्षेत्र सहाय्यक विकास शिंदे, वनरक्षक देवगडे (चालबर्डी), तसेच पवन मांढरे, टिंकू मांढरे, राजू कुडमेथे, शैलेश कुळसंगे, अनिल शेंद्रे, किशोर मडावी आणि कपिल झाडे यांनी मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.

दरम्यान, पकडण्यात आलेल्या बिबट्याला सध्या आयुध निर्माणी परिसरातील गंधा नाला नर्सरी येथे सुरक्षित ठेवण्यात आले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार त्याला योग्य अधिवासात सोडण्यात येणार आहे.

वन विभागाच्या या यशस्वी कारवाईमुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून पशुपालकांनी समाधान व्यक्त केले आहे. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी वन विभागाने सतत देखरेख ठेवावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos