बल्लारपूरमध्ये अवैध दारू वाहतुकीवर पोलिसांची कारवाई : ७८ हजारांचा मुद्देमाल जप्त

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालूका प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपूर पोलिसांनी रात्रीच्या गस्तीदरम्यान अवैध विदेशी दारू वाहतूक करणाऱ्या एका युवकावर धडक कारवाई करत तब्बल ७८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई २७ मे रोजी रात्री उशिरा बल्लारपूर फॉरेस्ट डेपोसमोरील हायवे रोड परिसरात करण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार, पोलीसांना गस्ती दरम्यान मुखबिरामार्फत एक इसम दुचाकीवरून अवैधरित्या दारू वाहतूक करीत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले.
तपासणीदरम्यान आरोपी सौरभ देवराव चव्हाण (वय २५), रा. बामणी, ता. बल्लारपूर याच्या ताब्यातील होंडा अॅक्टिव्हा क्रं. एमएच २९ सीएफ ३६१९ या दुचाकीच्या डिकीत विदेशी दारूचा साठा आढळून आला.
कारवाईत पोलिसांनी ब्लेंडर्स प्राईड व्हिस्कीच्या ७५० मिलीच्या ३ काचेच्या बाटल्या तसेच रॉयल चॅलेंज अमेरिकन प्राईड व्हिस्कीच्या १८० मिलीच्या १० प्लास्टिक बाटल्या जप्त केल्या. यासह दुचाकी वाहन असा एकूण ७८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपीविरुद्ध महाराष्ट्र मद्यनिषेध कायद्यान्वये कलम ६५ (अ) (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजू बगमारे, नासीर अली, राकेश मेंढे, रामराव टेकाम, पोअं प्रणय वानखेडे, राहुल चांदेकर यांनी केले.
News - Chandrapur




Petrol Price




