महत्वाच्या बातम्या

 आरपीएफ जवानांच्या तत्परतेने धावत्या रेल्वेखाली जाण्यापासून प्रवाशाचे प्राण वाचले


- बल्लारशाह रेल्वे स्थानकावरील आरपीएफ जवानांची तत्परता 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालूका प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारशाह रेल्वे स्थानकावर सोमवारी १८ मे रोजी घडलेल्या प्रसंगात रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ) जवानांच्या प्रसंगावधानामुळे एका प्रवाशाचा जीव वाचला. प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरून सुटलेल्या १२६२२ तमिळनाडू एक्सप्रेसमध्ये चढण्याच्या प्रयत्नात एक प्रवासी तोल जाऊन रेल्वे आणि प्लॅटफॉर्ममधील जागेत अडकून काही अंतर फरफटत गेला. मात्र आरपीएफ जवानांनी वेळीच धाव घेत त्याला सुरक्षित बाहेर काढले.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित प्रवासी नवी दिल्लीहून चेन्नईकडे तमिळनाडू एक्सप्रेसने प्रवास करीत होता. गाडी सुटत असताना तो डब्यात चढण्याचा प्रयत्न करीत असताना त्याचा तोल गेला आणि तो रेल्वेच्या दरवाजाजवळून खाली घसरला. हा प्रकार लक्षात येताच आरपीएफ बल्लारशाहचे आरक्षक पवन कुमार यादव यांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेत प्रवाशाला पकडून प्लॅटफॉर्मकडे ओढले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

या बचावकार्यात आरक्षक राकेश सिंह आणि मंगलदीप यांनीही तत्काळ मदत केली. तिघांच्या समन्वयपूर्ण प्रयत्नांमुळे संबंधित प्रवाशाला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्याची प्रकृती तपासून कोणतीही गंभीर दुखापत नसल्याची खात्री करण्यात आली आणि त्याला सुरक्षितपणे पुन्हा रेल्वेत चढविण्यात आले.

आरपीएफच्या या धाडसी आणि तत्पर कारवाईमुळे संभाव्य अपघात टळला असून उपस्थित प्रवासी व नागरिकांनी जवानांच्या कार्याचे कौतुक केले. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना धावत्या रेल्वेत चढण्याचा किंवा उतरण्याचा प्रयत्न करू नये, तसेच सुरक्षा नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos