गोंदिया : आदर्श बिगर शेती पतसंस्थेत २३ लाखांची फसवणूक : कार्यकारी अधिकाऱ्यावर गुन्हा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : सालेकसा येथील आदर्श बिगर शेती सहकारी पतसंस्थेत आर्थिक गैरव्यवहार आणि अफरातफर प्रकरणी कार्यकारी अधिकाऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तब्बल २३ लाख ६५ हजार ९७० रुपयांचा हा गैरव्यवहार असल्याचे पोलिसांनी तपासात स्पष्ट केले आहे.
तक्रारदार कृष्णकुमार हेमराज गहगये (४२, ह.मु. कामठा चौक, आमगाव) यांच्या तक्रारीनुसार, आरोपी जगदीश रामप्रसाद खोब्रागडे (वय ५४, रा. भजेपार, सालेकसा) हा आदर्श बिगर शेती सहकारी पतसंस्थेत कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होता. त्याने आपल्या पदाचा गैरवापर करून संस्थेच्या आर्थिक दस्तऐवज आणि ताळेबंदात खोटी नोंद केली.
चौकशीत असे आढळले की, आरोपीने गौतम धनराज शहारे, पूनम राधेश्याम नेवारे, संजय अंवा उके आणि नरेंद्र धामाडे यांच्या नित्य निधी रकमांमध्ये अफरातफर केली. तसेच बचत फंड आणि इमारत निधीची प्रत्यक्ष गुंतवणूक न करता ताळेबंदात गुंतवणूक दाखवून मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केली.
सन २०१८-१९ ते २०२२-२३ या कालावधीत आरोपीने एकूण २३ लाख ६५ हजार ९७० रुपयांची अफरातफर करून संस्थेच्या सभासदांची फसवणूक केली.
लेखापरीक्षकांची दिशाभूल केल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी सालेकसा पोलिसांनी भारतीय दंडसंहिता कलम ४२०, ४०६, ४०८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक पोठरे करीत आहेत.
News - Gondia




Petrol Price




