विदर्भात उष्णतेची लाट : वर्धा-अमरावतीत ४६°C पर्यंत तापमान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : विदर्भात उष्णतेचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. शनिवारी अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांना हॉटस्पॉट घोषित करण्यात आले, जिथे कमाल तापमान ४६ अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचल्याने नागरिक अक्षरशः होरपळले. सलग वाढणाऱ्या उष्णतेमुळे विदर्भातील जनजीवन विस्कळीत झाले असून, दुपारच्या वेळेत अनेक शहरांत रस्ते ओस पडल्याचे दृश्य पाहायला मिळाले.
हवामान विभागाच्या नोंदी -
हवामान विभागाच्या अहवालानुसार, अकोला येथे ४५.४°C, यवतमाळ आणि ब्रह्मपुरी मध्ये ४५.२°C तापमान नोंदवले गेले. नागपुरात कमाल तापमान ४३.८°C पोहोचले, जे सरासरीपेक्षा ०.३ अंश जास्त होते. उष्ण वाऱ्यांचा झोका आणि अंगावर कडक उन्हाची मार यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.
विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमान सरासरीपेक्षा जास्त असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. सकाळी आर्द्रता जास्त असली तरी दुपारपर्यंत हवा कोरडी झाल्यामुळे उकाडा आणि उमस दोन्ही वाढले, ज्यामुळे घराबाहेर पडणाऱ्यांना त्रास झाला.
रात्रीचे तापमान आणि पावसाची परिस्थिती -
रात्रीच्या तापमानात किंचित घट नोंदविण्यात आली असली तरी उष्णतेची तीव्रता कायम आहे. नागपूरमध्ये किमान तापमान २७.६°C नोंदवले गेले. शनिवारी विदर्भातील जिल्ह्यांमध्ये अधिकृत पावसाची नोंद नाही; तथापि, नागपूर शहरातील काही भागांमध्ये दुपारी ४ नंतर हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे काही काळ वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी उष्णतेच्या तीव्रतेत फारसा फरक पडला नाही.
उष्णतेची लाट कायम राहणार -
हवामान विभागाने पुढील काही दिवस विदर्भात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. नागरिकांनी दुपारच्या वेळेत अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि उष्माघातापासून काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रमुख शहरांचे तापमान (°C) -
वर्धा – ४६
अमरावती – ४६
अकोला – ४५.४
यवतमाळ – ४५.२
ब्रह्मपुरी – ४५.२
नागपूर – ४३.८
चंद्रपूर – ४३.६
वाशिम – ४३.२
गडचिरोली – ४२.६
गोंदिया – ४२.२
भंडारा – ४२
बुलडाणा – ४१.६
News - Nagpur




Petrol Price




