चंद्रपूर जिल्ह्यात ‘शून्य सावली दिवस’; २० मे रोजी विशेष निरीक्षण शिबिर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी/चंद्रपूर : वर्षभर आपली साथ करणारी सावली काही मिनिटांसाठी पूर्णपणे अदृश्य होणार असल्याने ‘शून्य सावली दिवस’ हा खगोलशास्त्रीय दुर्मीळ अनुभव चंद्रपूर जिल्ह्यात नागरिकांना अनुभवता येणार आहे. या पार्श्वभूमीवर २० मे रोजी चंद्रपूर शहरातील पोलीस फुटबॉल ग्राउंड येथे दुपारी १२ ते १२.४५ दरम्यान विशेष निरीक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.ही माहिती खगोल अभ्यासक तथा स्काय वॉच ग्रुपचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली. खगोलशास्त्रात रस असलेल्या विद्यार्थी, शिक्षक व नागरिकांनी या निरीक्षणासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. प्रा. चोपणे यांनी सांगितले की, सूर्याचा उत्तरायण व दक्षिणायन असा भासमान मार्ग पृथ्वीच्या २३.५० अंश उत्तर व दक्षिण अक्षांशांदरम्यान असल्याने कर्कवृत्त आणि मकरवृत्ताच्या दरम्यान येणाऱ्या भागात वर्षातून दोन वेळा ‘शून्य सावली दिवस’ अनुभवता येतो. या दिवशी दुपारी सूर्य नेमका डोक्यावर येत असल्याने काही क्षणांसाठी कोणत्याही वस्तूची सावली दिसत नाही.सूर्य दररोज सुमारे ०.५० अंशांनी सरकत असल्यामुळे तो एका अक्षवृत्तावर दोन दिवस राहतो. त्यामुळे काही ठिकाणी सलग दोन दिवस हा अनुभव घेता येतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यातील शून्य सावली दिवसांचे वेळापत्रक :
१८ मे – पाटण, विरूर, ढाबा, गांगपींपरी
१९ मे – राजुरा, कोरपना, गडचांदूर, पोंभुर्णा, कोठारी, बल्लारपूर
२० मे – मूल, सावली, चंद्रपूर, घुग्घुस, भद्रावती, माजरी
२१ मे – वरोरा, सिंदेवाही, चंदनखेडा, शेगाव, मोहर्ली
२२ मे – चिमूर, नेरी, कोलारा
२३ मे – ब्रम्हपुरी, भिसी, नागभीड
स्काय वॉच ग्रुपतर्फे जिल्ह्यातील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना हा अनोखा खगोलशास्त्रीय क्षण प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
News - Chandrapur




Petrol Price




