वाढत्या तापमानाच्या संकटावर पीक विविधता उत्तम पर्याय : डॉ. जीवन कतोरे

- शेतकरी शास्त्रज्ञ मंच सभा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : सध्याच्या बदलत्या हवामानात आणि अनिश्चिततेच्या काळात शेतकऱ्यांनी केवळ पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता पीक विविधता अंगीकारणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन कृषी विज्ञान केंद्र, सेलसुरा येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. जीवन कतोरे यांनी केले.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, सेलसुरा तर्फे हिंगणघाट तालुक्यातील भगवा येथे प्रगतशील शेतकरी बलराज श्योखंड यांच्या शेतावर शेतकरी शास्त्रज्ञ मंच या सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे अध्यक्ष दिलीप पोहाणे, सदस्य इरफान अली, निलेश नाखले, सिंजेंटा फाऊंडेशनचे भूषण गाडेगोणे, डॉ. भारती तिजारे डॉ. सचिन मुळे, डॉ. अंकिता अंगाईतकर आदी उपस्थित होते.
डॉ. कतोरे पुढे म्हणाले की, शेतातील झाडे पावसाच्या पाण्याचा वेग कमी करून ते जमिनीत मुरण्यास मदत करतात. ही झाडे मोठ्या प्रमाणावर कार्बन साठवून ठेवत असल्याने क्लायमेट चेंज विरुद्ध लढण्यासाठी त्यांची मोठी मदत होते. तसेच, झाडांमुळे मित्र कीटक आणि पक्ष्यांचा वावर वाढून नैसर्गिक कीड नियंत्रण शक्य होते, असे ते म्हणाले.
मुळचे हरियाणा येथील असलेले शेतकरी बलराज श्योखंड यांनी भगवा येथील आपल्या शेतात कापूस किंवा सोयाबीन यांसारखी पारंपरिक पिके न घेता बांबू, निलगिरी आणि सरू या झाडांची लागवड केली आहे. या ठिकाणी अॅग्रोटूरीझम विकसित करण्याचा त्यांचा मानस आहे. उपस्थित शास्त्रज्ञांनी या उपक्रमाची पाहणी करून हा प्रयोग कमी कष्टात शाश्वत उत्पन्न देणारा असल्याचे त्यांनी सांगितले.
या सभेत उपस्थित शास्त्रज्ञांनी विविध झाडांच्या फायद्यांबाबत माहिती दिली. इतर झाडांच्या तुलनेत बांबू अधिक ऑक्सिजन सोडतो आणि कार्बन शोषून घेण्याचे उत्तम साधन आहे. निलगिरी पाणथळ किंवा कमी सुपीक जमिनीत उत्तम येते. ही झाडे जमिनीतील क्षारांचे प्रमाण नियंत्रित करतात आणि कागद व इंधन उद्योगासाठी कच्चा माल पुरवतात. सरूच्या मुळांवर फ्रँकिया नावाचे जिवाणू असतात, जे हवेतील नत्र जमिनीत स्थिर करून जमिनीचा पोत सुधारते, असे मार्गदर्शन शास्त्रज्ञांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अंकिता अंगाईतकर यांनी केले. सभेच्या यशस्वितेसाठी गजेंद्र मानकर, गणेश वायरे आणि भगवा येथील ग्रामस्थांनी विशेष सहकार्य केले. शास्त्रज्ञांशी थेट संवाद आणि प्रत्यक्ष शेतावरील प्रयोगामुळे उपस्थित शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
News - Wardha




Petrol Price




