महत्वाच्या बातम्या

 पीकस्पर्धा रब्बी हंगाम : शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागाकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते, अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना, मिळालेल्या उत्पाकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्याची इच्छाशक्ती, मनोबल यामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत  तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल तसेच त्यांचे मार्गदर्शन परीसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या उत्पादनात भर पडेल हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. या पिकस्पर्धेत विभागातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक यांनी केले आहे.
पीक स्पर्धेतील पीक
रब्बी पीक : ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस पीकस्पर्धेतील पिकांची निवड करताना त्या पिकांचे तालुक्यातील एकूण लागवड क्षेत्र किमान १ हजार हेक्टर असावे. तथापि संबंधित पिकाखालील क्षेत्र हजार हेक्टरपेक्षा कमी असल्यास व स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावयाचा असल्यास कृषी संचालक विस्तार व प्रशिक्षण यांची विहीत मागीने लेखी परवानगी घेणे बंधनकारक आहे.
स्पर्धक संख्या पीकस्पर्धा क्षेत्र, कापणी प्रयोग
पीकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीचे स्वतःच्या शेतावर त्या पिकाखाली भात पिकासाठी किमान २० आर इतर पिकासाठी ४० आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.
स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क
सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी पीकनिहाय (प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र ) रक्‍कम ३०० रुपये राहील. तालुकास्तरावर स्पर्धा आयोजनासाठी सर्वसाधारण गटासाठी किमान १० व आदिवासी गटासाठी किमान ५ यापेक्षा प्रवेश अर्ज असल्यास पिकस्पर्धा रद्द करण्यात येऊन प्रवेश शुल्क परत देण्यात येईल.
अर्ज दाखल करण्याची तारीख
रब्बी हंगामामध्ये पीक स्पर्धेची अर्ज दाखल करण्याची तारीख खालील याप्रमाणे राहील. ज्वारी, गहू हरभरा व जवस या पिकासाठी १ डिसेंबर आहे. अर्ज दाखल करण्याच्या तारखेच्या दिवशी शासकीय सुट्टी असल्यास त्यापुढील शासकीय सुट्टी नसलेली तारीख गृहीत धरण्यात येईल.
तालुकास्तर व जिल्हास्तरावरील पीकस्पर्धा निकाल प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाचे पिकस्पर्धा विजेते निवडण्यात येतील. या पद्धतीने पीकस्पर्धा घ्यावयाचे हे प्रथम वर्ष असल्याने प्रथम फक्त तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय पीकस्पर्धा घेण्यात येईल. राज्यपातळीवरील पिकस्पर्धा चालूवर्षी होणार नाहीत. मागील वर्षाच्या तालुकास्तरीय स्पर्धेतील पिकनिहाय पहिल्या तीन क्रमांक विजेत्या शेतकऱ्यांनी जिल्हास्तरीय पीकस्पर्धेमध्ये सहभाग घ्यावे.
बक्षिसांचे स्वरुप 
तालुकास्तरीय सर्व साधारण व आदिवासी गट- बक्षिस प्रथम ५ हजार, द्वितीय-३ हजार व तृतीय-२ हजार रुपये तर जिल्हास्तरीय प्रथम-१० हजार रुपये, द्वितीय-७ हजार रुपये व तृतीय-५ हजार रुपये राहणार आहेत.
रब्बी हंगाम दुय्‍यम तसेच पौष्टिक धान्य पिकाच्या क्षेत्रात आणि उत्पादनात वाढ होणे आवश्यक आहे. ही बाब विचारात घेऊन पिकस्पर्धेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे, आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी उपविभागीय कृषी अधिकारी किंवा कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावे.





  Print






News - Nagpur




Related Photos