महत्वाच्या बातम्या

 भंडारा जिल्ह्यात उष्माघाताची तयारी : ३३ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात कक्ष सुरू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : भंडारा जिल्ह्यात दरवर्षी एप्रिल, मे आणि जून महिन्यात उष्माघाताचे प्रमाण वाढते, ज्यामुळे गंभीर रुग्णप्रकरणे आणि मृत्यू होण्याची शक्यता निर्माण होते. याला लक्षात घेऊन जिल्हा आरोग्य विभागाने उष्माघात प्रतिबंधक उपाययोजना सुरु केल्या आहेत.

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ३३ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये १ मार्च २०२६ पासून उष्माघात कक्ष (कोल्ड रूम) सुरू करण्यात आले आहेत. तसेच सर्व वैद्यकीय अधिकारी यांना २० फेब्रुवारी २०२६ रोजी वातावरणातील बदल आणि उष्माघात याबाबत प्रशिक्षण दिले गेले.

उष्माघाताची लक्षणे -
प्रौढांमध्ये : शरीराचे तापमान ४०°C (१०४°F) पर्यंत वाढणे, स्नायूंचे आखडणे, उलटी किंवा मळमळ, लाल, गरम आणि कोरडी त्वचा, चक्कर येणे, चिंता किंवा भीती वाटणे, हृदयाचे ठोके वाढणे, भ्रम, दिशाहीनता, चिडचिड, झटका किंवा कोमा

लहान मुलांमध्ये -
आहार न घेणे, चिडचिड किंवा सुस्ती, लघवीचे प्रमाण कमी होणे, शुष्क डोळे, मानसिक भ्रम किंवा सुस्ती, कुठूनही रक्तस्त्राव, तोंडाजवळील त्वचा कोरडी होणे. 

उन्हात बाहेर जाताना खबरदारी -
पुरेसे पाणी प्यावे; प्रवासात पाण्याची सोबत ठेवा., हलके, फिकट रंगाचे, सैलदार कपडे घालावे; गॉगल, छत्री, पादत्राणे वापरावीत., टोप्या/हॅट घालावी; पाळीव प्राणी सावलीत ठेवावे., ओलसर पडदे, पंखा किंवा कुलर वापरून घर थंड ठेवावे.  

उपचार व आरोग्य सुविधा -
उष्माघाताची लक्षणे दिसल्यास जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय किंवा जिल्हा सामान्य रुग्णालयात ताबडतोब उपचारासाठी जावे. शक्य असल्यास थंड पाणी किंवा ORS प्यावे.

कक्षांमध्ये उपलब्ध सुविधा -
- हवेशीर खोली, पंखे आणि कुलर
- आवश्यक औषधांचा साठा व कोल्ड स्टोरेज
- रुग्णांसाठी २ बेड, आइस पॅक, कोल्ड सलाईन आणि अन्य साहित्य.

मनुष्यबळ व रुग्णवाहिका -
सामान्य व उपजिल्हा/ग्रामीण रुग्णालयांमध्ये १ तज्ञ डॉक्टर, २ वैद्यकीय अधिकारी आणि पॅरामेडिकल स्टाफ उपलब्ध, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये २ वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचारी, जिल्ह्यात ११ रुग्णवाहिका (१०८), त्यात ३ ALS (Advanced Life Support) आणि ८ BLS (Basic Life Support), उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांवर एकूण ५० रुग्णवाहिका (१०२) सेवेसाठी कार्यरत.

मागील पाच वर्षांतील उष्माघात नोंदी -
वर्ष मृत्यू उपचारासाठी दाखल
२०२१ ० ०
२०२२ ० ८
२०२३ ० ०
२०२४ ४ २७
२०२५  ० २            

आरोग्य अधिकाऱ्यांचा सल्ला -
डॉ. मिलींद सोमकुवर (जिल्हा आरोग्य अधिकारी), डॉ. सचिन चव्हान (जिल्हा सर्वेक्षण अधिकारी) आणि डॉ. श्रीकांत आंबेकर (जिल्हा साथरोग तज्ञ) यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की उष्माघाताची लक्षणे दिसल्यास ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्रात उपचार घ्यावेत.





  Print






News - Bhandara




Related Photos