पिसाळलेल्या कुत्र्याचा बळी : प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ४ वर्षीय सायरा नंदनवारचा मृत्यू, तळोधीत संताप


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : नागभीड तालुक्यातील तळोधी (बाळापूर) येथील बामणी वॉर्डात पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात ४ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सायरा सुरेश नंदनवार असे मृत बालिकेचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २४ मार्च रोजी सायरा घराजवळ खेळत असताना पिसाळलेल्या कुत्र्याने तिच्या गालावर हल्ला करून गंभीर जखमी केले. घटनेनंतर कुटुंबीयांनी तिला तत्काळ ग्रामीण रुग्णालय, नागभीड येथे दाखल केले. तिची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी ब्रह्मपुरी येथील एका खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. काही दिवस उपचारानंतर तिला घरी सोडण्यात आले; मात्र जखम गंभीर असल्याने प्रकृती सतत खालावत गेली आणि अखेर ११ एप्रिल रोजी तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेने गावकऱ्यांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी २२ जानेवारी रोजी याच पिसाळलेल्या कुत्र्याने सहा जणांना चावा घेतल्याची घटना घडली होती. त्यावेळी ग्रामपंचायत तळोधी (बाळापूर) यांच्याकडे कारवाईची मागणी करण्यात आली होती. मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
सायराच्या मृत्यूमुळे ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त करत जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच भटक्या आणि पिसाळलेल्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीने उपाययोजना राबवाव्यात, अन्यथा अशा घटना पुन्हा घडण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, आरोग्य विभाग व स्थानिक प्रशासनाने या घटनेची दखल घेऊन परिसरात लसीकरण व नियंत्रण मोहिम राबविण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
News - Chandrapur




Petrol Price




