महत्वाच्या बातम्या

 विदर्भातील प्राथमिक शाळा १५ जूनपासून सुरू : पालक व शिक्षकांमध्ये संतापाची लाट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : शैक्षणिक सत्र २०२६-२०२७ मध्ये संपूर्ण राज्यासह विदर्भातील प्राथमिक शाळा १५ जूनपासून सुरू करण्याचे शिक्षण संचालनालयाकडून आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. मात्र, विदर्भातील उकाडा लक्षात घेता या निर्णयावर पालक आणि शिक्षकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

विदर्भातील शाळा सहसा जून महिन्यातील उष्णतेमुळे २६ जून किंवा एक जुलैच्या दरम्यान सुरू होतात. परंपरेनुसार, शाळा जूनच्या दुसऱ्या सोमवारला किंवा २६ जून रोजी सुरू होण्याची पद्धत गेल्या अनेक वर्षांपासून चालू होती. मात्र, २००६-२००७ मध्ये शासनाने हा परंपरागत निर्णय बदलून १५ जून रोजी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. शिक्षक संघटना आणि सामाजिक संस्थांनी या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागितली होती.

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ८ जून २००७ रोजी शासनाचा निर्णय रद्द करत विदर्भातील शाळा एक जुलैच्या दरम्यान सुरू होण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीचा औचित्य साधत दरवर्षी २६ जूनला शाळा सुरू करण्याची पद्धत रुजली होती. मात्र अलीकडे शासनाने शिक्षण संचालनालयाला वेगवेगळ्या तारखांना शाळा सुरू करण्याची सूचना दिल्याने ही परंपरा खंडित झाली आहे.

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनराज बोडे यांनी सरकारवर टीका करत म्हटले, विदर्भात जून महिन्यात पारा ४५ अंशांच्या जवळपास पोहोचतो. अशा उष्णतेत मुलांना शाळेत पाठवणे धोक्याचे आहे. सरकारला विदर्भाच्या तापमानाचा विसर पडला आहे.

तापमान वाढीच्या पार्श्वभूमीवर विदर्भातील पालक आणि शिक्षकांना या निर्णयामुळे शाळेच्या सुरुवातीस आरोग्य आणि सुरक्षेबाबत चिंता निर्माण झाली आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos