जम्मू - काश्मीरमधील भाजप नेत्याच्या घरावर दहशतवाद्यांनी केला ग्रेनेड हल्ला : ५ जण जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / राजौरी :
जम्मू -काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाला आहे. दहशतवाद्यांनी राजौरी येथील भाजप मंडळ अध्यक्षांच्या घरावर ग्रेनेड फेकला आहे. या हल्ल्यात ५ जण जखमी झाले असून त्यांना राजौरी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच या हल्ल्यात एका मुलाचा मृत्यू झाला. 
जम्मू -काश्मीरमध्ये लष्कर आणि स्थानिक पोलिसांकडून करण्यात येत असलेल्या कारवाईमुळे दहशतवादी भडकले आहेत आणि स्थानिक नेत्यांना सतत लक्ष्य करत आहेत. गुरुवारी रात्री उशिरा दहशतवाद्यांनी राजौरी येथे भाजपचे मंडळ प्रमुख जसवीर सिंह यांच्या घरावर ग्रेनेडने हल्ला केला.
घटनेची माहिती मिळताच जम्मू -काश्मीर पोलीस आणि सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचले असून सर्व बाजूंनी परिसर सील करण्यात आला आहे. दहशतवाद्यांच्या शोधात पोलिसांकडून परिसरात मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवली जात आहे. त्याचबरोबर हल्ल्यात जखमी झालेल्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भाजप नेत्याच्या घरावर हल्ला होण्याची ही ३ दिवसातील दुसरी घटना आहे.
काही दिवसांपूर्वी जम्मू -काश्मीरच्या अनंतनागमध्ये एका भाजप नेत्याची आणि त्याच्या पत्नीची हत्या करण्यात आली होती. दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात झालेल्या हल्ल्यात भाजप नेता आणि त्यांच्या पत्नीवर गोळ्या झाडल्या होत्या. या घटनेनंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र दोघांचाही मृत्यू झाला. शहरातील लाल चौकात दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता. गेल्या काही वर्षांत भाजप नेत्यांवरील हल्ले सातत्याने वाढत आहेत.
  Print


News - World | Posted : 2021-08-13Related Photos